कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटनबंदी असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरासह पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
लोणावळा आणि खंडाळ्याच्या परिसरासह पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी घाट, मुळशी, मावळ परिसरात वर्षांविहारासाठी मोठय़ा संख्येने मुंबई-पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक येतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मावळ तालुक्यात असलेले गड, किल्ले, लेण्या तसेच पवना धरणाच्या परिसरातही मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देतात. बंदी उठविल्याने पर्यटकांना हे परिसर खुले झाले आहेत.
पर्यटनबंदी मागे घेण्यात आली असली, तरी पर्यटक तसेच ग्रामस्थांनी कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन नियमांचे पालन करावे. पर्यटक तसेच ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.