Publish Date: Tue, 17 Feb 2026 (21:00 IST)
Updated Date: Tue, 17 Feb 2026 (21:04 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्या चुकीच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. भिवंडीतील वेहलेगाव रोडजवळ रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. हे दोन्ही तरुण मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते. रात्री ११:३० च्या सुमारास ते दिवाकडे जात असताना त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या चुकीच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला धडकली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला. मृतांची ओळख आयुष विजय जाधव (१९) आणि ऋषिकेश राजेश जाधव (२५) अशी आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. नारपोली पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Edited By- Dhanashri Naik