Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन कोटी नागरिकांना फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या माध्यमातून पक्षाला जोडणार

chandrashekhar bawankule
, शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (20:46 IST)
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात फ्रेंडस् ऑफ बीजेपी या मोहिमेतून दोन कोटी नागरिकांना जोडणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले.
 
 
ते रत्नागिरी जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन उपस्थित होते.
 
मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, समाजामध्ये असा फार मोठा वर्ग आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देतो. राष्ट्रभक्तीने भरलेला डॉक्टर, वकील, साहित्यिक अशा प्रबुद्ध नागरिकांच्या वर्गाला भारतीय जनता पार्टीबद्दल आत्मीयता आहे पण तो पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही. अशा नागरिकांना ‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’ या अभियानातून पक्षाशी जोडून घेतले जाईल. त्यांनी एका मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिला की त्यांना एक लिंक पाठविली जाईल. त्या लिंकवर त्यांनी त्यांची नाव, पत्ता इत्यादी माहिती भरली की त्यांना स्मार्ट कार्ड आणि गाडीवर लावण्याचे स्टीकर पाठवले जाईल. तसेच त्यांना व्हॉटस् अपद्वारे नियमितपणे मोदीजींच्या केंद्र सरकारविषयी, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारच्या कामाविषयी आणि भाजपाविषयी माहिती देण्यात येईल.
ते म्हणाले की, १८ ते २५ वयोगटातील युवकांना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झालेले हवे आहे. त्यांना भाजपाने युवा वॉरिअर्स हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून युवकांना डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, सरकारच्या विविध योजना, नवीन धोरणाच्या आधारे प्रगल्भता निर्माण करणारे कार्यक्रम, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
 त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा राज्यातील ५ कोटी ६५ लाख लाभार्थींना लाभ झाला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मोदीजींना धन्यवाद मोदी असे लिहिलेली पत्रे गोळा करण्याचा उपक्रम पक्षाने सुरू केला आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यातील दोन कोटी लाभार्थींशी संपर्क साधण्यात येईल.
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भक्कम आहे. युवकांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून देणारा एकही प्रकल्प आता रत्नागिरी जिल्ह्यातून परत जाणार नाही. स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना समजावून हे सरकार प्रकल्प अंमलात आणेल, असे ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टेडियम स्वच्छ करणारे फॅन्स