छत्रपती संभाजीनगरमध्ये आरतीच्या आवाजावरुन दोन गट समोरासमोर आल्याची घटना घडली आहे. संभाजीनगरमधील चिकलठाणा भागातील कामगार कॉलनीत मंगळवारी (12 मार्च) संध्याकाळी हनुमान मंदिरात आरती सुरू होती.
त्यावेळी दोन गट आमनेसामने आले आणि परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 13 मार्चच्या संध्याकाळीही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.दोन्ही दिवशी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली. चिकलठाणा पोलिसांना ही माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवलं. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
संभाजीनगरमधील चिकलठाणा भागातील कामगार कॉलनीत मंगळवारी (12 मार्च) संध्याकाळी हनुमान मंदिरात आरती सुरू होती.यावेळी आरती करणाऱ्या लोकांना एका गटानं आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि बाचाबाची सुरू झाली.त्यानंतर दोन्ही गटातील तरुण मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
यावेळी दगडफेक झाल्याचं माध्यमांमध्ये आलं आहे. पण, यावेळी परिसरात दगडफेक आणि मारहाण झाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे."सध्या परिसरात शांतता असून आरसीएफ आणि सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तीन जण जखमी आहेत, तेही गाडीवरुन स्लीप झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत," असं एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक आत्माराम घुगे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
आरतीच्या वेळा बदलून दिल्या
मंगळवारच्या या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळेला आरती करण्याचं आवाहन केलं.
हनुमान मंदिरात 8 ते 8.30 च्या दरम्यान आरती करण्याचं एका गटाला सांगण्यात आलं. तर रात्री साडेआठ नंतर प्रार्थना करण्याचं दुसऱ्या गटाला सांगण्यात आलं.दरम्यान, बुधवारच्या संध्याकाळीही आरतीच्या वेळेस दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याचं समोर आलं. यावेळी एका गटाकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
आरतीनंतर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. या आरतीसाठी काही जण दुचाकीवर येत असताना त्यांच्यावर अज्ञात टोळक्याने दगडफेक केल्याचा आरोप या दगडफेकीतील जखमींनी केला. दरम्यान, घटनेनंतर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी हा जमाव पांगवला.
एफआयआरमध्ये काय म्हटलंय?
एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी 14 मार्च 2024 रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
या एफआयआरमध्ये नमूद केलंय की, "13 मार्चच्या संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कामगार कॉलनीत बंदोबस्तासाठी हजर होते. साडेआठच्या सुमारास अनोळखी मुलं 8 ते 10 मोटारसायकलवर हॉर्न वाजवत आले. त्यात एकाची गाडी घसरली आणि मग मागून येणाऱ्या गाड्या त्याच्या गाडीवर घसरल्यामुळे जोराचा आवाज येऊन गोंधळ निर्माण झाला.
"पोलिसांनी मोटरसायकलवरील मुलांना समज दिली. पण त्यानंतर ही मुलं आणि वस्तीतील जमलेल्या अनोळखी लोकांनी गोंधळ सुरू ठेवला आणि दगडफेकीचा प्रकार घडला. त्यानंतर आणखी पोलिस तिथं हजर झाल्यानंतर जमाव तिथून निघून गेला."
Published By- Priya Dixit