कोल्हापूर दौऱ्यावर असलेले भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीवर आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर?” असं उदयनराजे भोसले बोलले आहेत.
उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. “हे पंचायत राजची संकल्पना सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केलं काँग्रेस-राष्ट्रवादीनं? सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरलं. याला गुलामगिरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.