गणेशोत्सवात डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे पत्रकच डॉल्बीला नकार देण्याऱ्यांनी काढावे असा आक्रमक पवित्रा खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी डॉल्बी वाजण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला असतानाही आता पोलीस यु टर्न घेत डॉल्बी नाहीच म्हणत असल्याच्या अनुषंगाने उदयनराजेंनी आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सातारच्या शासकीय विश्रामगृहात उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, की डॉल्बी व्यावसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासन कधी विचार करणार आहे की नाही. या व्यावसायिकांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली असल्याने डॉल्बीवर बंदी आल्यास त्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. साताऱ्यातच डॉल्बीला बंदी आणि इतरत्र डॉल्बी जोरजोरात वाजने, असा दुजाभाव का, अन् तो व्हायला नकोच. सातारा जिल्ह्यातच बंदी, मग ती महाराष्ट्रभरही लागू आहे का? साताऱ्यातच आडकाठी कशासाठी याचे सविस्तर निवेदन प्रशासनाने काढावे. संबंधित अधिका-यांनी डॉल्बी व्यावसायिकांचाही विचार करुन निर्णय घ्यायला नको का? या व्यावसायिकांच्या भांडवलाचे काय? तुम्ही डॉल्बी सिस्टीम घेऊन या व्यवसायिकांची गुंतवणूक परत करणार आहात का? डॉल्बी वाजल्याने थोडेच आभाळ कोळसणार आहे का? असे सवाल उपस्थित केला.