“उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या निमित्ताने लगावला.
“माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे,” असं “उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. “मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,” असंही सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.