महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच शिवसेनेतील ठाकरे-शिंदे गट, तसंच भाजपा यांच्या संबंधातील कडवटपणा आता स्पष्ट होऊ लागला आहे. भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या सभेत अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली होती.
भाजपाचे वरिष्ठ नेते तसेच राज्यातील इतर नेते, शिंदे गट, राज ठाकरे यांची शेलक्या शब्दांत संभावना उद्धव ठाकरे यांनी केली. आता त्याला भाजपा आणि शिंदे गट, मनसे तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल 22 सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, "मुंबई महानगरापालिका धुतली यांनी, मुंबईकरांचं शोषण केलं याने. एवढ्या वर्ष महानगरपालिका यांच्याकडे. पण यांनी मुंबई बकाल केली. बेस्टमध्ये वेळेत पगार नाही, महानगरापालिकेत पगार नाही. डबघाईला आणल्या दोन्ही संस्था. काही येत नाही याला. हा जगातला 'ढ' माणूस आहे. एवढा 'ढ' माणूस मी पाहिला नाही. दोन वाक्यं सांगितली की, उद्धवजी हे बोला हा.. पण हा बोलतो काही तरी भलतंच. सगळी दुसऱ्याकडून कामं करुन घेतली याने. त्यामुळे मोदी वगैरेंवर बोलू नको. तुला जड जाईल, तू नखाएवढा पण नाही."
उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पुढे म्हणाले, "काय तर म्हणे कोथळा काढणार.. तू काढणार का कोथळा? आमच्यासारखे लोक हे अजून जिवंत आहेत भाजपमध्ये. वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तर जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही. या पुढे वाकड्या नजरेनं पाहिलं आणि कोणालाही भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या कोणत्या व्यक्तीच्या केसाला जराही धक्का लागला ना तर तू महाराष्ट्रात फिरुनच दाखव."