'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. ' मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ' काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसेच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत.