शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच महानगरपालिका व नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याची माहिती शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
राज्य सरकारने आपल्या सनदी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून एक दिवसाचे वेतन द्यावे असे आवाहन केले आहे. त्याला शिवसेनेनेही आपला खारीचा वाटा म्हणून आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना एक महिन्याचे मानधन देण्याचे आवाहन केले आहे, असे रावते यांनीे सांगितले. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपला वाटा म्हणून 10 लाख रुपये देणार आहेत, असे रावते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.