Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नवजात अर्भकाला अशी केली मदत

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी  नवजात अर्भकाला अशी केली मदत
, शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:24 IST)
अनेकदा सर्वसामान्यांना काही बाबींची तातडीने आवश्यकता असते. ती नक्की कशी पूर्ण होईल, अशा विवंचनेत असतात. आणि अचानक मदतीला कुणीतरी धावून येते. असाच काहीसा अनुभव प्रणव जोशी यांना आला आहे. मदत करणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नसून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार याच आहे.
प्रणव जोशी हे इंजिनिअर असून ते नाशिकचे आहेत. त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाला अपत्यप्राप्ती झाली. मात्र, सातव्या महिन्यातच मातेची प्रसुती झाल्याने ते बाळ अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे त्याला तातडीने आळे फाटा येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती पाहता त्याला तातडीने अँटीबायोटिक इंजेक्शन देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या इंजेक्शनचा आळेफाटा येथे व अन्य ठिकाणी चौकशी करण्यात आली. मात्र, ते उपलब्ध होत नव्हते. त्याचवेळी प्रणव यांचे बंधू प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी हे औषध हवे असल्याचा संदेश नाशिक थिंक टँक या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये टाकला. त्यानंतर त्या संदेशाची तत्काळ दखल डॉ. पवार यांनी घेतली. डॉ. पवार यांनी त्यांच्या स्वीय सहायकाला सांगून तातडीने प्रणव यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. स्वीय सहायकाने क्षणाचाही विलंब न करता मुंबई नाका येथील मेडिकल एजन्सीमधून हे औषध खासगी ट्रॅव्हल्सद्वारे रातोरात आळेफाटा येथे पाठविले. हे औषध उपलब्ध झाले आणि त्याच रात्री बाळावर उपचारही सुरू झाले. ही मदत नक्की कुणामार्फत मिळाली, असा प्रश्न प्रणव यांना पडला. त्यामुळे त्यांनी तातडीने संबंधित नंबरवर चौकशी केली. तेव्हा स्वीय सहायकाने नम्रपणे सांगितले की, ही मदत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यामुळे होत असली तरी त्यांनी मला तसे सांगण्यास मनाई केली आहे.
तत्काळ मिळालेल्या या मदतीमुळे प्रणवसह त्यांचे नातेवाईक व बाळाचे पालक यांना गहिवरुन आले आहे. थेट केंद्रीय मंत्री आपल्याला प्रत्यक्ष मदत मिळवून देतात यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीय. यासंदर्भात प्रणव म्हणाले की, आजवर अनेकदा मतदान केले. लोकप्रतिनिधींशी फारसा संपर्क येत नाही. पण, वेळेप्रसंगी इतकी मोठी व्यक्ती मदतीला धावून येते, ही बाबच खुप सुखावून जाणारी आहे. औषध मिळाल्यामुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉ. पवार यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. डॉ. पवार यांची अपॉईंटमेंट मिळाल्यास प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानण्याची इच्छा असल्याचे प्रणव यांनी सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दिला मोठा आदेश