Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस!

rain
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (08:14 IST)
नागपूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असतानाच आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पुन्हा राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, मंगळवारी विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वातावरणात गारठाही मोठ्या प्रमाणात असल्याने आजाराचा धोकाही वाढला आहे.
 
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाला असून, आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. पुढील २४ तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मिचॉन्गचा सर्वाधिक फटका तामिळनाडूला बसला असून, दक्षिणेकडील राज्यांना याच्या झळा अधिक सोसाव्या लागत आहे. चेन्नईत मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले आणि विविध दुर्घटनात ८ जणांचा मृत्यू झाला. तसेच पुरामुळे भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे आणि विमान वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५ ते ९ डिसेंबरदरम्यान विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो. दरम्यान, आज मंगळवारी ब-याच भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यातच सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबी पिकांना पुन्हा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यातच वातावरणात गारठा वाढल्याने मानवी आरोग्यवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
आजपासून तीव्रता वाढणार?
विदर्भातील काही भागासह मराठवाड्यातही अवकाळी पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ६ डिसेंबरला त्याची तीव्रता अधिक परिणामकारक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी : झेडपीचं तिकीट नाकारलं, पोलिसांनी उचलून नेलं, आता मुख्यमंत्रिपदी