Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

ambedkar jayanti
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (15:14 IST)
दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
 
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच नवीन पिढीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
इयत्ता पहिली ते पाचवी साठी वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय (वेशभूषेसह) स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण हे विषय असतील. वक्तृत्व आणि एकपात्री अभिनयासाठी दिलेल्या तीनपैकी कोणत्याही विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करता येईल. तर चित्रकला स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर ए-4 आकाराच्या कागदावर चित्र काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार आहे.
 
इयत्ता सहावी ते आठवी साठी निबंधलेखन, वक्तृत्व, स्वरचित कविता, काव्यवाचन, पोस्टरनिर्मिती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार-डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पैलू हे विषय असतील. निबंधलेखनासाठी दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर ३०० ते ५०० शब्दांपर्यंत ए-४ आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करावा लागेल. स्वरचित कवितालेखन आणि काव्यवाचनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित स्वरचित कविता ए-४ आकाराच्या कागदावर लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि काव्यवाचनासाठी काव्य म्हणून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा. पोस्टर निर्मिती आणि रांगोळी स्पर्धेसाठी भारतरत्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या जीवनातील विविध पैलू यावर पोस्टर तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
 
इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व, व्हिडिओनिर्मिती, दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह, एकांकिका, एकपात्री अभिनय, कथाकथन आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येतील. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरू : तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा जोतिबा फुले, सम्राट अशोक आणि भारताची राष्ट्रीय प्रतीके, माझी शाळा माझे ग्रंथालय, माझ्या घरातील समृद्ध ग्रंथालय या विषय असतील. निबंधलेखन आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंधासाठी ए-४ आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि वक्तृत्वासाठी तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा. व्हिडिओ निर्मिती – इंटरनेटवरील फोटोंचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारी तीन मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी. दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह विषयासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणाऱ्या फोटोंचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा. तर कथाकथन, एकांकिका व एकपात्री अभिनय आणि रांगोळी स्पर्धेअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारा तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा आणि या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
 
उपरोक्तप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #muknayak या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे. व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ इथे देण्यात यावी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत उत्कृष्ट उपक्रमांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशा सूचना याबाबत जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फी भरली नाही म्हणून शाळेत कोंडलं