राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मराठवाड्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.