दोन आठवड्यापूर्वी परळच्या आंबा महोत्सवात आलेल्या एका मराठमोळ्या उद्योगपतीची एका अॅसिड पीडितेवर नजर पडली आणि तिचे अवघ्ये आयुष्यच बदलून गेले. या उद्योगपतीने तिचे लग्न लावून दिले. तर अभिनेता विवेक ऑबेरॉयने तिला ठाण्यात फ्लॅट देऊन तिचे खर्या अर्थाने पुनर्वसन केले.
दोन आठवड्यापूर्वी परळला आंबा महोत्सव पार पडला. मराठमोळे उद्योगपती ऋषिकेश कदम या आंबा महोत्सवात आले होते. यावेळी सुहास फाउंडेशनच्या स्टॉलवर अॅसिडमुळे चेहरा भाजलेली 26 वर्षीय ललिताबेन बन्सी त्यांना दिसली. कदम यांनी तिची चौकशी केली असता त्यांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. अॅसिड हल्ल्यानंतर ललिताबेनने एक नंबर डायल केला होता. हा राँग नंबर लागला, पण या राँग नंतरने तिचे नशीब उजळून गेले.
मलाडमध्ये सीसीटीव्ही ऑपरेटचे काम करणार्या 27 वर्षीय राहुल कुमारला तिचा फोन लागला होता. त्यानंतर दोघांचे वारंवार बोलणे सुरू झाले. गप्पांचे प्रेमात रूपांतर झाले. गेली दोन महिने फोनवरून संपर्कात राहिल्यानंतर या दोघांनीही लग्न करायचे ठरवले, असे कदम म्हणाले. ही माहिती ऐकल्यानंतर ललिताबेनचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ललिता आणि राहुल यांचे शिवाजी पार्क येथील डिसिल्व्हा टेकनिकल इन्स्टिट्यूटमध्ये लग्न लावून दिले. नंतर ठाणे कोर्टात त्यांच्या लग्नाची रजिस्टर नोंदही केली, असे कदम म्हणाले.