हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी बघितलेले स्वप्न त्यांचे नाव घेत जे निवडून आले त्यांनी धुळीला मिळवले, असा हल्ला करीत आता मुंबईला मोठे करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला मत द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना यांच्यावर जोरदार टीका केली.
"निवडणूक आली की कोणतीही भरीव कामगिरी न केलेली ही मंडळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची ओरड सुरु करतात. भावनिक राजकारण पेटविण्याचा प्रयत्न सुरु होतो," असंही फडणवीस यावेळी म्हणाले.