राज्यातील आघाडी सरकारने आम्हाला पहिल्यांदाच चहापानाचा आमंत्रण दिलं आहे. पण राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सरकार कोणत्या मुद्द्यावर संवेदनशील नाही. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच राज्यातील प्रमुख मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाहीला कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. पण महाराष्ट्र सरकारची मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि रोखशाही सुरू आहे, असा हल्ला फडणवीसांनी चढवला. राज्यातील विविध प्रश्नांवर राज्य सरकारला विधानसभेत जाब विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यात, शेतकऱ्यांच्या प्रश्न, एसटी कामगारांचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न रेंगाळले असून सरकारचे दुर्लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय.