जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले असून, धरणातून दहा हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दरवाजा क्र. १० ते २७ या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले.
जायकवाडी धरणातून यापूर्वी २००८ मध्ये सकाळी ११ वाजता १ लाख क्युसेक्सने पाणी सोडले होते. हे पाणी गोदावरी नदीपात्राबाहेर न गेल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. परंतु २००६ मध्ये अडीच लाख क्युसेक्सने पाणी सोडले, तेव्हा ७० टक्के पैठण शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय १५ गावांतही पाणी घुसले होते.