Publish Date: Fri, 13 Mar 2026 (10:37 IST)
Updated Date: Fri, 13 Mar 2026 (10:46 IST)
लोणार सरोवराची पाणी पातळी वाढली असून, परिसरातील काही मंदिरे पाण्याखाली गेल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाणी पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अनपेक्षित पावसामुळे आणि परिसरातील भूगर्भीय बदलांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली
सरोवराच्या काठावर असलेली धार, कमळजा देवी मंदिर आणि इतर काही प्राचीन मंदिरे अंशतः पाण्याखाली गेली आहे. यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना या मंदिरांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही भागांत पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला आहे.
पाण्याची क्षारता आणि रंग बदलण्याची शक्यता
लोणार सरोवर हे त्याच्या अति-क्षारीयआणि खाऱ्या पाण्यासाठी ओळखले जाते. मोठ्या प्रमाणावर गोड पाणी सरोवरात मिसळल्यामुळे पाण्याचे रासायनिक संतुलन बदलण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ज्याप्रमाणे सरोवराचा रंग गुलाबी झाला होता, तसाच काही बदल सूक्ष्मजीवांच्या हालचालींमुळे पुन्हा घडू शकतो का, यावर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहे.
भूगर्भीय हालचालींचे संकेत?
काही तज्ज्ञांच्या मते, केवळ पावसामुळे इतकी वाढ होणे शक्य नाही. सरोवराच्या तळाशी असलेल्या काही जलस्रोतांच्या हालचालींमुळेही पाणी पातळी वाढली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (GSI) आणि नीरी (NEERI) चे पथक लवकरच सरोवराच्या पाण्याचे नमुने घेण्याची शक्यता आहे.
पर्यटनावर परिणाम
सरोवराच्या सखल भागात जाणाऱ्या पायवाटा निसरड्या झाल्याने आणि पाणी वाढल्याने वन विभागाने पर्यटकांना सुरक्षित अंतरावरूनच सरोवर पाहण्याचे आवाहन केले आहे.
सरोवराच्या काठावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणीही वाढत्या पाण्यात उतरू नये.
लोणार हे रामसर स्थळ असल्याने यातील पाणी पातळीचा आणि पर्यावरणाचा कोणताही बदल जागतिक पातळीवर अभ्यासला जातो. या बदलामुळे सरोवरातील जैवविविधतेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Edited By- Dhanashri Naik