भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता लतादीदींचे स्मारक तयार करण्याची मागणी होत आहे. ज्या ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी लतादीदींचे स्मारक उभारावे अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. अशातच मंगेशकर कुटुंबीयांपैकी ह्दयनाथ मंगेशकर यांनी स्मारकाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी स्मारकाचा वाद थांबवावा अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ हीच दीदींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. शिवाजी पार्कात लतादीदींचे स्मारक व्हावे अशी इच्छा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपने लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कातच व्हावी अशी मागणी केली होती. पण या मागणीला शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला नव्हता. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कातील स्मारकाला विरोध केला.