राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली आहे. सध्या वातावरण पोषक आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मौसमी पाऊस दाखल होणार असून यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रासह देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल निनो तटस्थ अवस्थेत आहे . ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्यात ला-नीना स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून हिंद महासागरातील द्वि ध्रुविता तटस्थ अवस्थेत आहे. सध्या मोसमी पावसासाठी हवामान पोषक आहे. यंदा जुलै महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
राज्यातील कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात कमी पण सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलकी ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.