राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर जाण्याचं टाळावं, असं आवाहनही हवामान विभागानं केलं आहे.
राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील दोन-चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई, पालघर, ठाणे लातूर, नांदेड, नंदुरबार राज्याच्या उर्वरित भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून हवामानात होणाऱ्या बदलांबद्दलची माहिती दिली आहे. 'पुढच्या 4 ते 5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. कृपया विजा चमकताना घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर, संध्याकाळी व रात्रीपर्यंत असते', अशी माहिती देत त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.