Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयद्रावक मित्रांना वाचवायला गेला अन् तोही बुडाला, तीन तरुणांचा मृत्यू

हृदयद्रावक मित्रांना वाचवायला गेला अन् तोही बुडाला, तीन तरुणांचा मृत्यू
, शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (20:41 IST)
नाशिक : इगतपुरी येथील इगतपुरी नगर परिषदेच्या तलावात तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे इगतपुरी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच इगतपुरीमध्ये दोन भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच आता पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की इगतपुरी येथील एका स्थानिक तरुणासह बाहेरगावाहून येथे पाहुणे म्हणून आलेले दोघे जण फिरावयास गेले होते.
तलावाजवळ आल्यानंतर त्यापैकी दोन जण पाय घसरून तलावात बुडू लागले. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी गेलेला तिसराही बुडाला. दरम्यान, ही घटना परिसरातील काही नागरिकांना कळल्यावर त्यांनी नगर परिषदेला आणि पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर तत्काळ नगर परिषदेचे कर्मचारी जनसेवा प्रतिष्ठान व स्थानिक युवकांनी तलावात उड्या मारल्या. त्या तिघांनाही बाहेर काढून तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू असतानाच तिघांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला.
 
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरात नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने त्याची चर्चा सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी महाशिवरात्रीला सोमनाथच्या दर्शनासाठी पोहोचले