Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NEET परीक्षेतील पेपरफुटीचं लातूर कनेक्शन काय आहे? ते कसं आलं समोर?

neet exam
, गुरूवार, 27 जून 2024 (09:03 IST)
NEET 2024 परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना अटक झाली असून दोन्ही आरोपींना लातूर मुख्य न्यादंडाधिकारी कोर्टानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
पण, NEET परीक्षेतील पेपरफुटीचं लातूरसोबत कनेक्शन कसं काय जुळलं? इथून नेमके कोणते व्यवहार होत होते? पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलंय? जाणून घेऊया.
 
चौघांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड एटीएसच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लातूरमधून दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं. एटीएसने चौकशी करून दोघांनाही सोडून दिलं होतं. त्यानंतर दहशतवादविरोधी पथक एटीएसचे पोलीस निरीक्षक आवेज मकसूद अहमद काझी यांनी लातूर पोलिसांत चार जणांविरोधात तक्रार दिली.
 
त्यानुसार सोलापुरातील माढा तालुक्यातील टाकळी इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय तुकाराम जाधव आणि लातूरमधल्या कातपूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जलील उमरखाँ पठाण,
 
धाराशिव इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीवर असलेला इरन्ना कोनगलवार आणि दिल्ली येथील गंगाधर जी. अशा चौघांविरोधात केंद्र सरकारनं नव्यानं तयार केलेल्या पेपर फुटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यापैकी लातूर पोलिसांनी जलील उमरखाँ पठाणला 23 जूनला रात्री उशिरा ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून 24 जूनला मुख्य न्यायदंडधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
 
जलील पठाणला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती आरोपीचे वकील अजित शिंदे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.
 
सोमवारी (24 जून) लातूर गुन्हे शाखेनं या प्रकरणातील दुसरा आरोपी शिक्षक संजय जाधवला अटक केली होती. त्याच्याविरोधात फसवणुकीचा आणि कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
मंगळवारी 25 जूनला लातूर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर केलं असता पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचले आहेत हे तपासण्यासाठी 10 दिवसांची पोलिस कोठडी मागितली.
 
पण, कोर्टानं 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याचं आरोपी संजय जाधवचे वकील अॅड. बोराडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
लातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय ठेवला असून कोणीही या प्रकरणावर अधिकृतपणे अधिक माहिती द्यायला तयार नाहीत.
 
सध्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत, तर धाराशिव औद्योगिक विकास संस्थेत नोकरीवर असलेला इरण्णा कोनगलवार आणि दिल्लीतील आरोपी गंगाधर जी. या दोघांचा शोध सुरू आहे.
 
पेपरफुटीचं लातूर कनेक्शन
पण, मग नीट पेपरफुटीचं लातूरसोबत कनेक्शन कसं जुळलं, हा प्रश्न उपस्थित होतो.
 
एटीएसनं 23 जूनच्या रात्री संजय जाधव आणि जलील पठाण या दोन्ही शिक्षकांची चौकशी केली. यावेळी त्यांच्या मोबाईलमधले फोटो, व्हॉट्सअप चॅट, मेसेज सगळं तपासण्यात आलं.
 
यात जलील पठाणच्या मोबाईलमध्ये NEET परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आणि आर्थिक व्यवहाराचे मेसेजेस दिसले. त्याने हेच मेसेज दुसरा आरोपी संजय जाधवला केले होते.
 
जलील पठाण परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत व्यवहार करून त्यांचे प्रवेशपत्र संजय जाधवला पाठवत होता. त्यानंतर संजय जाधव हे प्रवेशपत्र धाराशिव इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणाऱ्या इरन्ना कोनगलवारला व्हॉट्सअप करत होता.
 
चौकशीदरम्यान संजय जाधवने इरन्नाला मेसेज केल्याचे मान्य देखील केले आहे. इरन्ना कोनगलवार हा दिल्लीतल्या गंगाधर जी. या आरोपीसोबत संपर्कात असून या दोन्ही शिक्षकाकडून घेतलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र तो दिल्लीला गंगाधरला पाठवायचा.
 
इरन्नाच्या माध्यमातून गंगाधरसोबत दिल्लीत परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पैशांचा गैरव्यवहार होत होता, अशी माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या एएफआयरमधून समोर आली आहे.
 
NEET गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत काय घडलं?
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) नीट-2024 परीक्षेतील गोंधळाप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केलाय.
 
सीबीआयने जारी केलेल्या पत्रकानुसार, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या लिखित तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
FIR मधील आरोपांनुसार, 'NTA मध्ये 4 हजार 750 केंद्र आणि 14 शहरांमधील नीट-यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीट-यूजी परीक्षेत 23 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील काही परीक्षा केंद्रांवर गोंधळाचा प्रकार समोर आला.'
 
शिक्षण मंत्रालयानं शनिवारी (22 जून) नीट-यूजी परीक्षेत कथित गोंधळाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. केंद्र सरकारनं नीटची परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या सुबोध कुमार सिंह यांना महासंचालक पदावरून हटवलंही आहे. त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरौला यांना एनटीएच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार दिला आहे.
 
दरम्यान, 23 जून रोजी होणारी NEET-PG परीक्षाही सरकारने पुढे ढकलली.
 
याआधी, राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (National Testing Agency - NTA) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली.
 
ही समिती मंत्रालयाला परीक्षा प्रक्रिया यंत्रणेतील सुधारणा, माहिती साठ्याच्या नियमाधारीत व्यवस्थेतील सुधारणा आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना, तसंच कार्यपद्धतीबद्दल शिफारसी सादर करेल.
 
काय आहे NTA?
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देशपातळीवरील पात्रता परीक्षांचं आयोजन करण्यासाठी NTA (National Testing Agency) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर चाचणीची तयारी, आयोजन आणि त्याच्या मार्किंगसंदर्भातील संपूर्ण तयारी अंमलबजावणी आणि समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
आंतरराष्ट्रीय मानकं, कार्यक्षमता आणि पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया आणि भरतीसाठी उमेदवारांचं मूल्यांकन करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून केलं जातं.
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या माध्यमातून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश/फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यात NEET आणि NET या परीक्षांसह इतर परीक्षांचा समावेश असतो.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघरमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग, 10 जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली