भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवणे ही महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी एसटी संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. कोणलाही शरद पवार यांची अॅलर्जी असण्याचे कारणच काय? शरद पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे. याशिवाय, शरद पवार हे महाविकासआघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाचा तिढा दोन महिन्यांपासून सुटलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांना कामगारांची काळजी वाटणे साहजिक आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.