Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी इतिहासजमा झालो असं लोक म्हणत असताना शरद पवारांनी मात्र विश्वास टाकला- एकनाथ खडसे

eknath khadse
, गुरूवार, 9 जून 2022 (13:13 IST)
पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. खडसे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्वीट करून ही घोषणा केली. खडसे यांच्याबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
 
आज (9 जून) ते दोघे अर्ज भरतील.
 
खडसेंनी काय म्हटलं?
मी अनेक वर्षं राजकारणात आहे. त्यामुळे आमदारकीचं मला कौतुक नाही. पण भाजपनं ज्या परिस्थितीत मला ढकललं आणि त्यावेळी राष्ट्रवादीनं मला आधार दिला, असं एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलं.
 
एकनाथ खडसे इतिहासजमा झाले असं लोक म्हणत असताना शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे.
 
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली नाही. त्याबद्दल प्रश्न विचारला असताना खडसेंनी म्हटलं, "आजचं भाजपचं रुप आहे त्यात मोठं योगदान मुंडेचं आहे. त्यांनी विस्तार करून भाजपचा पाया मजबूत केला आहे. पंकजावर अन्याय आहे. ज्यांनी पक्षासाठी काही केलं नाही ते पदावर येतात. ज्यांनी या पक्षासाठी काम केलं त्या पंकजा मुंडे ना न्याय मिळायला हवा होता. मला त्यावर जास्त बोलायचं नाही"
 
वर्तमानपत्रात जी माहिती मिळाली त्यानुसार राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात घोडेबाजार सुरू आहे. भाजप शिवसेना युती असताना 23 वर्षांत हे प्रश्न सामंजस्याने सुटले. आता आतताईपणाची भूमिका आहे ती लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. घोडेबाजाराला वाव देणं राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. सध्याचे विरोधी पक्ष नेते अनुभवी आहेत असंही ते म्हणाले.
 
मुंडे साहेबांचे जे सहकारी होते. त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला हे निश्चित आहे असं एकनाथ खडसे म्हणाले.
 
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये झालेल्या अन्यायावर वेळोवेळी आवाज उठवला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात.
 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी भाजपच्या नेतेपदाचा राजीनामा देऊन 23 ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
 
माझी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतो आहे. असा आरोप त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना केला होता.
 
"माझ्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले, जर मी त्यातून बाहेर पडलो नसतो तर ३ वर्षे जेलमध्ये गेलो असतो. किती आरोप सहन करायचे? मला खूप त्रास दिला गेला. गेली चार वर्षे मानसिक तणावाखाली जगलो." आपली सर्व सहनशक्ती संपल्याच खडसे यांनी म्हटलं.
 
2014 पासून असंतोषाचे वारे
भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून एकनाथ खडसे सातत्याने पक्ष नेतृत्वावर नाराज होते. त्यांनी कायम देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावेळी ते राज्याचे महसूल मंत्री होते.
 
त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52 /2अ /2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केला.
 
हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अकानी नामक या व्यक्तीकडून खरेदी केला होता. पण या भूखंडाचा सातबारा 'एमआयडीसी' च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.
 
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौकशी आणि अकानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. परंतु 2018 एकनाथ खडसे यांना क्लिन चिट देण्यात आली.
 
दरम्यान, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी झोटींग कमिटीची स्थापन करण्यात आली. या समितीमार्फतही प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bank Strike : बँका 3 दिवस बंद राहणार, 5 डे वीक मागणीसाठी 27 जूनला कर्मचारी संपावर जाणार