Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समीर वानखेडेंच्या बदलीने फायदा कोणाचा? क्रांती रेडकर यांचा सवाल

समीर वानखेडेंच्या बदलीने फायदा कोणाचा? क्रांती रेडकर यांचा सवाल
, मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (14:27 IST)
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
"समीर त्या खुर्चीवरून हटले तर फायदा कोणाचा? हे लहानमोठ्या पेडलर्सचं काम नाही. बर्थ सर्टिफिकेट काढणं वगैरे यासाठी पैसा लागतो. यात कोणाचा वैयक्तिक फायदा आहे," असा सवाल अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी उपस्थित केला आहे.
 
"नबाव मलिक यांचे सगळे खोटे आरोप आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील ते पुरावे कोर्टात सादर करतील. ट्विटरवर कोणीही उठून काहीही लिहू शकतं. तुम्ही वानखेडेंच्या पूर्ण गावाचं आणि कुटुंबाचं सर्टिफिकेट पाहा. डॅडींनी काल ते दाखवलं होतं. आख्ख गाव कसं वेगळं सर्टिफिकेट करून घेईल. तसंच त्यांचं बर्थ सर्टिफिकेट ऑनलाईन उपलब्ध का नाही याचा नवाब मलिकांशी शोध घ्यावा," असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
 
तसंच माझा पती खोटा नाही, मग आम्ही हे का सहन करायचं. रोज रोज का सिद्ध करायचं. ट्विटर कोर्ट आहे का? कोर्टात आरोप केले आणि सिद्ध झाले तर म्हणू शकतो, असं क्रांती यांनी म्हटलंय.
ज्या माणसाला 15 वर्षांचा रेकॉर्ड क्लीन आहे, त्याच्याबद्दल असं का म्हटलं जाईल. तसंच आरोप ते करतायत. कोर्टात त्यांनी जावं. आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. कोट्यवधींची संपत्ती नाही, असंसुद्धा क्रांती यांनी म्हटलंय.
 
"पाणी नाकावर गेलं तर जाऊ कोर्टात. तोवर लोकांच्या मदतीने लढू. नवाब मलिकांना माझ्या शुभेच्छा. ते सुखी राहोत. तसंच समीर 100 टक्के या सगळ्यातून बाहेर पडतील. शेवटी सत्याचा विजय होतो. वेळच उत्तर देईल. त्यांना अजून कशाकशात गोवायचा प्रयत्न करतील, पण ते सिद्ध करणं कठीण आहे," असा आरोप देखील रेडकर यांनी केला आहे.
 
या सगळ्याचा निश्चित त्रास होतो. मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला माझ्याच महाराष्ट्र राज्यात कोणीतरी धमकावतं. बाहेरच्या राज्यातून मला पाठिंबा मिळतोय. ते आम्हाला सुरक्षा देतायत पण अँटी समीर वानखेडे लोक आम्हाला प्रचंड त्रास देतायत, धमक्या देतायत, असा आरोपसुद्धा क्रांती यांनी केला आहे.
 
वानखेडेंनी माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करावा - नवाब मलिक
एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे त्याची चौकशी करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
 
समीर वानखेडे यांनी 26 प्रकरणांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने निनावी पत्र लिहून आपल्याला ही माहिती दिल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
 
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार आहे. त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. समीर यांचं पहिलं लग्न इस्लामी पद्धतीनं झालं होतं. त्यांनी खोट प्रमाणपत्र सादर करून एका मागासवर्गीयाचा हक्क हिसकावला आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
"भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने धर्म बदलल्यानंतर जात कायम राहात नाही, धर्म बदलला नसल्याचं वानखेडेंचं म्हणणं असेल तर त्यांनी जन्मदाखला दाखवावा," असं मलिक यांनी म्हटलंय.
 
समीर वानखेडे यांनी 1000 कोटींपेक्षा जास्तीची वसुली केली आहे. मालदीवमध्येही वसुली झाली होती, असा दावा मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडेंनी कोणत्या अधिकाराने माझ्या मुलीच्या निलोफर मलिकचे कॉल रेकॉर्ड डीटेल्स मागितले? हा खासगी हक्कांचा भंग नाही का, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
 
समीर वानखेडे 2 लोकांमार्फत फोन टॅप करतायत, इंटरसेप्ट करताय. एक मुंबईत एक ठाण्यात आहेत, असा आरोपसुद्धा त्यांनी केलाय.
दाऊद वानखेडे यांनी माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करावा असं मी त्यांना आव्हान करतो, असं मलिक म्हणाले आहेत.
 
नवाब मलिक यांना आलेल्या पत्रातील मजकूर
'बॉलीवूड कलाकारांना ड्रग्ज केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम समीर वानखेडे करत आहेत. बॉलीवूडमधल्या दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांना अशा पद्धतीने फसवण्यात आलं आहे.
 
वकील अयाझ खान यांनी हे पैसे एकत्र करून दिले. अयाज खान हा समीर वानखेडे यांचा मित्र असून, तो कोणत्याही अडथळ्याविना एनसीबीच्या कार्यालयात येऊ जाऊ शकतो. दर महिन्याला बॉलीवूड कलाकारांकडून पैसे मिळवून देतो. समीर वानखेडे बॉलीवूड कलाकाराला पकडतो तेव्हा अयाझ खानला वकील करा असं सांगतो.
 
समीर वानखेडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील असा अधिकारी आहे आणि मीडियात झळकावं अशी त्याची इच्छा असते. यासाठी त्याने अनेक निर्दोष माणसांना NDPS केसेसमध्ये फसवलं आहे.
 
खोट्या केसेस बनवण्यासाठी समीरने स्वतंत्र टीम तयार केली आहे. यामध्ये सुप्रिडेंडंट विश्व विजय सिंह, आयओ आशीष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी.गोरे, विष्णू मीना, सूरज, ड्रायव्हर अनिल माने यांच्यासह समीरचा वैयक्तिक सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे.
 
कोणाच्याही घरी चौकशी सुरू असताना ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी.मोरे, ड्रायव्हर अनिल माने ड्रग प्लांट्स ठेवत असत. यानुसार खोटी केस दाखल करण्यात येत असे. ड्रग्जची खरी मात्रा लिहिण्याऐवजी ड्रग्जचं प्रमाण वाढवून इंटरमीडिएट केलं जात असे जेणेकरून त्या व्यक्तीला जामीन मिळू नये.
 
आयओ आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयो सुधाकर शिंदे नकली पंचनामे बनवत असत. दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासीर, आदिल उस्मानी यांच्याकडून समीर ड्रग्ज मिळवत असे. हे खरेदी करण्यासाठी समीर सिक्रेट सर्व्हिस फंड तसंच लोकांच्या घरी छाप्यादरम्यान लुटण्यात आलेल्या पैशांचा वापर करत असे.
 
समीर गेल्या महिनाभरापासून भाजपचे दोन कार्यकर्ते के.पी.गोसावी आणि मनीष भानूशाली यांच्या संपर्कात आहे. ऋषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांना दिल्लीहून आलेल्या फोनमुळे सोडून देण्यात आलं. यासंदर्भात समीर वानखेडेचे कॉल डिटेल्स चेक केले जाऊ शकतात.
 
मी सांगितलेल्या केसेसची चौकशी केली जावी. समीर वानखेडे कशा खोट्या केसेस दाखल करत आहेत आणि एनडीपीएस अक्टचा दुरुपयोग करत आहे हे स्पष्ट होईल. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी यासंदर्भात स्वतंत्र आयोग नेमून याची चौकशी करावी. मी एनसीबीचा कर्मचारी असल्याने माझं नाव उघड करू शकत नाही, ते उघड केलं तर मला फटका बसू शकतो.
 
या पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यांना पाठवण्यात आली आहे.'
 
कोणत्याही चौकशीला तयार - वानखेडे
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची आता खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. समीर वानखेडे सध्या दिल्लीत आहेत.
 
"काही जण मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचं वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे," असं समीर वानखेडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
 
प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. तसंच NCB ची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचा दावा NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
 
"गुन्ह्याची चौकशी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी साईल यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसंच साक्षीदाराने हे प्रतिज्ञापत्र कूहेतूने दाखल केलंय," असं NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
 
NCB वर खंडणी वसूल करण्याचे आरोप करणं म्हणजे चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे, असंसुद्धा त्यांनी म्हटलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

३ वाहनांचा विचित्र अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी