Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शीतल म्हात्रे कोण आहेत, ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात गेल्या?

शीतल म्हात्रे कोण आहेत, ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात गेल्या?
, मंगळवार, 12 जुलै 2022 (22:27 IST)
फोटो साभार- सोशल मीडिया शिवसेना प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
 
शिवसेना आमदारांच्या बंडानंतर मुंबईतील पहिला नगरसेवक फुटून शिंदे गटात सामील झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत बंडाळी सुरू झाल्यामुळे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जातोय.
 
बीबीसी मराठीशी बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या, "बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यात मी माझा खारीचा वाटा देत आहे."
 
एकनाथ शिंदे यांनी बंद पुकारल्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी मैदानात उतरून आंदोलन केलं होतं. आता काही दिवसातच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे.
 
कोण आहेत शीतल म्हात्रे?
शीतल म्हात्रे शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या. उत्तर मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड नंबर 8 मधून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलंय.
 
शीतल म्हात्रे यांच्या राजकीय कारकिर्दीला 12 वर्षांपूर्वी सुरूवात झाली. शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली. आणि 2012 मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या.
 
शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. 2012 आणि 2017 ला सलग दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.
 
शीतल म्हात्रे यांचा राजकीय प्रवास
शिवसेना प्रवक्त्या
अलिबाग आणि पेणच्या शिवसेना संपर्कप्रमुख
2 वेळा प्रभाग समिती अध्यक्ष
मुंबई महापालिकेच्या कायदा (लॉ) समितीच्या सदस्य
राष्ट्रीय एड्स कंट्रोल सोसायटीच्या सदस्य
'बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी घेतला निर्णय'
शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केलाय.
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यात मी माझा खारीचा वाटा देत आहे."
 
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी बंडखोरांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. तर, अलिबागमध्ये बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात भाषण ठोकलं होतं.
 
त्या पुढे म्हणाल्या, "मला ईडीची नोटीस नाही. मला बॉक्सही मिळाले नाहीत. माझ्यावर कोणाचा दबाव नाही."
 
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिका करणाऱ्या शीतल म्हात्रेंनी शिंदेसेनेत प्रवेश का केला याचं उत्तर मात्र देणं टाळलं.
 
शीतल म्हात्रे यांच्याविरोधात FIR
तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शीलत म्हात्रे आणि इतर पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. रोड रेज प्रकरणी एका 22 वर्षीय व्यक्तीचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
 
मुंबईच्या एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हात्रेंच्या जवळच्या लोकांनी शिविगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पिडीत व्यक्तीने तक्रारीत केला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG: जसप्रीत बुमराहची घातक गोलंदाजी; भारताकडून इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव