शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहापोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेसाठी पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उपस्थित होते. पवारांच्या मागे महिला नेत्या उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणात नसलेल्या पण इतक्या महत्त्वाच्या व्यासपीठावर बसलेल्या या नेत्या कोण असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला गेला.
त्यांचं नाव- सोनिया दुहान. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने शपथ घेतली होती त्यावेळी राज्यात आणि राज्याबाहेर बरंच नाट्य घडलं होतं. त्यावेळी सोनिया दुहान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्याबाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.
अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार उपस्थित होते असं सांगण्यात आलं. त्यातले काही आमदार राष्ट्रवादीमध्ये परत येऊ लागले. त्याच दिवशी दुपारी चार वाजता शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार उपस्थित झाले.
अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे होते अशी चर्चा तेव्हा दिवसभर होती. त्यांना मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना जवळपास ताब्यात घेऊनच पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात आणलं.
आता नरहरी झिरवळ, अनिल पाटील, नितीन पवार, दौलत दरोडा यांनीही पुन्हा आपल्या मूळ पक्षाशी निष्ठा जाहीर केली यातल्या तीन आमदारांना सोमवारी हरियाणामधील गुरुग्राम येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेनं मुंबईला परत नेलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्या टीमने ही सुटका केली होती.
अशी झाली सुटका...
सोनिया दुहान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ऑपरेशन गुरुग्रामबद्दल माहिती दिली. त्या स्वतः गुरुग्राममध्ये राहातात. त्या म्हणाल्या, "आमच्या (राष्ट्रवादी) काँग्रेसच्या आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये बंद केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु नक्की कोणतं ओबेरॉय हॉटेल हे आम्हाला समजलं नव्हतं. दिल्ली आणि गुरुग्राम अश दोन ठिकाणी ओबेरॉय हॉटेल्स आहेत."
"आमच्या आमदारांनांही आपल्याला कुठे ठेवण्यात आलंय हे माहिती नव्हतं. त्यांनी फूड ऑर्डर बूकवरून ओबेरॉयमध्ये आहोत इतकाच मेसेज कसाबसा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
गुरुग्रामच्या ओबेरॉयमध्ये आम्ही 200 लोकांना घेऊन गेलो. त्यासाठी 2 टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. हे तिघे पाचव्या मजल्यावर आहेत असं आम्हाला समजलं ते 5109, 5100, 5111 या खोल्यांमध्ये होते आणि त्यांच्यावर भाजपच्या सुमारे 100 ते 150 लोकांचा पहारा होता."
मागच्या दाराने केली सुटका
"या लोकांना सोडवण्यासाठी आमच्या टीमने हॉटेलमध्ये रुम्स बुक केल्या आणि दिवसभर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही तेथे राहिलो. जसे आमचे एकेक आमदार दृष्टीस पडले तसे एकेकाला हॉटेलच्या काही स्टाफच्या मदतीनं मागच्या दाराने आम्ही बाहेर काढलं. त्यानंतर गोएअरच्या विमानानं त्यांना मुंबईत आणलं. आता ते तिघेही आपल्या इतर सहकारी आमदारांबरोबर आहेत आणि आनंदी आहेत."
शनिवारीच चार्टर्ड विमानाने आले होते दिल्लीत...
सोनिया दुहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या आमदारांना शनिवारी सकाळी शपथविधीनंतर तात्काळ दिल्लीला आणण्यात आलं होतं. त्या तिघांनाही आपल्याला चार्टर्ड विमानाने कुठे नेत आहेत हे माहिती नव्हतं. तसंच इथं आल्यावरही आपण दिल्लीला आलो आहोत हे त्यांना माहिती नव्हतं."
अखिल भारतीय कामगार सेनेचं सर्वत्र लक्ष
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यात अखिल भारतीय कामगार सेनेचे कार्यकर्तेही हातभार लावत होते. कामगार सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी याबाबत बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते म्हणाले, "कामगार सेनेचे कार्यकर्ते विमानतळ तसंच सर्व मोठ्या हॉटेलांमध्ये आहेत. पक्षाची जबाबदारी आणि एक पक्षनिष्ठा म्हणून ते सर्व हालचालींवर लक्ष ठेवत होते. डोळे उघडे ठेवा आणि हालचालींची माहिती प्रमुख नेत्यांना कळवा अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात. शिवसैनिक म्हणून ते ही जबाबदारी पार पाडत होते. त्याचप्रमाणे मोठ्या हॉटेलांमध्येही आमची युनियन गेली अनेक वर्षं आहेतच. आम्ही 24 तास दक्ष असतो."
आम्ही शरद पवार यांच्याबरोबरच- दौलत दरोडा, अनिल पाटील
मुंबईत पोहोचल्यावर अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांनी आम्ही शरद पवार यांच्याबरोबरच आहोत, असं सांगितलं. माध्यमांशी बोलताना दौलत दरोडा म्हणाले, आम्ही गुरुग्राममध्ये सुखरुप होतो. आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याशी संपर्कात होतो.
तर अनिल पाटील म्हणाले, "आम्हाला अजित पवार यांनी सकाळी सात वाजता भेटण्याचे आदेश दिले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार होत नाही असा संदेश आम्हाला आला. तसंच आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार होणार असं सांगितलं गेलं. आम्ही गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथं 100 ते 200 भाजपा कार्यकर्ते होते तसेच साध्या वेशातले अनेक लोक होते.
संध्याकाळी आम्ही बंडखोरी केली अशा बातम्या येऊ लागल्यावर आम्हाला सगळा प्रकार माध्यमांतून समजला. त्यानंतर आम्ही शरद पवार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत असा विश्वास त्यांच्याकडे व्यक्त केला. तेथून बाहेर पडण्यास थोडी अडचण वाटत होती. ते समजल्यावर पवार साहेबांनी आम्हाला परत आणण्याची व्यवस्था केली."