औरंगजेब.... ही पाच अक्षरं याच क्रमानं एकत्र आली की भारतात शाळेत इतिहास शिकलेल्या कोणत्याही मुलाच्या डोक्यात लख्खकन दिवे पेटतात. वेगवेगळ्या पद्धतीने औरंगजेब शालेय जीवनापासून नंतर वयाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत आपल्यासमोर येत राहातो.
त्यातही महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेत, घरात, गोष्टींमध्ये, पुस्तकांत शिकलेल्या माणसाला औरंगजेब नाव फक्त माहितीच नसतं तर इतर प्रांतांतील माणसांपेक्षा जरा जास्त माहिती असते.
छ. शिवाजी महाराजांच्या विरोधातील त्याच्या कारवाया, मराठा साम्राज्यावर सतत केलेले हल्ले, शिवाजी महाराजांनी त्याने पाठवलेल्या शाहिस्तेखानासारख्या सरदारांना तितक्याच ताकदीने उत्तर देणं, सुरतेची लूट, पुरंदरचा तह, आग्र्याला महाराजांना कैदेत ठेवणं इथपासून आपल्याला औरंगजेबाचा संबंध आलेला माहिती असतो.
इतकंच नाही तर छ. संभाजी महाराजांना अत्यंत हालहाल करून त्याने मारल्यामुळे महाराष्ट्रात राहाणाऱ्या लोकांना हा इतिहासाचा टप्पा भावनिक उंबरठ्यावर उभा करतोच.
आजही त्याच्या फोटोचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं, मोर्चांमध्ये पोस्टर झळकवणं अशा गोष्टी झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया उमटत राहाते. इतिहास, राजकारण अशा अनेक आघाड्यांवर औरंगजेब डोकं वर काढतो किंवा ते वर काढलंही जात असावं.
आज आपल्याला औरंगजेब बादशहा एक धुंद, सत्तापिपासू, त्याच्या शत्रूला हालहाल करुन मारणारा बादशहा होता अशी एका वाक्यात कल्पना असली तरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात यापेक्षा अनेक गोष्टी होत्या. स्वतःला सिंहासन मिळण्यापासून ते पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यातच त्याला आयुष्य काढावं लागलं.
त्याला सुरुवातीची 40 वर्षं फक्त मुघलांचा बादशहा होण्यासाठी खर्ची घालावी लागली. सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षांचा सुवर्णकाळ भोगला खरा पण आपलं राज्य वाढवण्यासाठी, मुलाची बंडखोरी मोडण्यासाठी त्याला दक्षिण भारतात यावं लागलं.
एवढ्या मोठ्या शक्तिशाली बादशहाला 26 वर्षं तंबूत राहावी लागली. त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा हा एखाद्या सिनेमातल्या शोकांतिकेसारखा होता. कष्ट, सुवर्णकाळ आणि शोकात्म अंत हे सगळं त्यानं त्याच्या दीर्घ आयुष्यात भोगलं होतं.
महाराष्ट्रातल्या इतिहासावर औरंगजेबाचा इतर बादशहांपेक्षा सर्वात जास्त काळ प्रभाव पडलेला दिसून येतो.
छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही छ. शाहू यांना कैदेत ठेवणं, त्यानंतर ताराराणी यांच्याशी संघर्ष, शेवटी महाराष्ट्रातच मृत्यू होणं असा पुढेही औरंगजेबाचा महाराष्ट्राशी संबंध आलेला दिसतो.
औरंगजेबाची माहिती घेण्याआधी आपण आधी थोडीशी मुघलांच्या आधीच्या बादशहांच्या नावाची उजळणी करू.
तैमूराच्या वंशातला बाबराने मुघल साम्राज्याचा पाया रचला. त्यानंतर त्याचा मुलगा हुमायुन बादशहा झाला. त्यानंतर अकबराने राज्य चालवले. अकबराचा मुलगा जहांगीर याने गादी सांभाळल्यानंतर शाहजहान बादशहाने मुघल साम्राज्याचा कारभार पाहिला. औरंगजेब हा याच शाहजहानचा पुत्र होय.
शाहजहान बादशहाला औरंगजेबासह मुराद बक्ष, दारा शुकोह, शाह शुजा असे पुत्र होते. औरंगजेबाचा जन्म सध्याच्या गुजरातमधील दाहोद येथे 1618 साली झाला.
राजकारणाचा आणि त्याचा संबंध वयाच्या अगदी कोवळ्या वयापासून आला असं म्हणता येईल. शाहाजहानने सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच वडिलांविरोधात म्हणजे जहाँगीर बादशहाविरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश आलं नाही. त्यामुळे वडिलांबरोबर झालेल्या माफीच्या करारातील एका मुद्द्यानुसार औरंगजेब आणि दारा शिकोह यांना लाहोर दरबारी ओलीस ठेवण्यात आलं होतं.
अखेर 1627 साली जहाँगीर बादशहाचा मृत्यू झाल्यावर शाहजहानने मुघल सत्तेची सूत्रं हाती घेतली. त्यानंतर औरंगजेब आणि दारा शिकोह आग्र्याला परतले.
सुधाकर हत्तीशी लढाई
औरंगजेबाने आपल्या पुढच्या आयुष्याची चुणूक अत्यंत कमी वयातच दाखवली होती. एके दिवशी सुधाकर आणि सुरतसुंदर या दोन हत्तींची लढाई आग्रा किल्ल्याजवळ यमुनेच्या काठी आयोजित केली होती. या लढाईत मदमस्त सुधाकर हत्तीने अचानक घोड्यावर बसलेल्या 14 वर्षांच्या औरंगजेबावर हल्ला केला.
तरीही विचलित न होता औरंगजेबाने आपला भाला हत्तीच्या डोक्यावर मारला. हत्तीनं त्याला पाडलं तरी तो न डगमगता तलवार उपसून हत्तीसमोर उभा राहिला.
शेवटी इतरांनी औरंगजेबाचे प्राण वाचवले. मात्र या एका प्रसंगातून त्याने आपल्या पुढच्या आयुष्याची एक झलक दाखवली आणि पुढचे आयुष्य खरंच या मार्गाने गेले.
दख्खनची सुभेदारी
1634 मध्ये मुघल शासनात नेमणूक झाल्यावर औरंगजेबाची 1636 साली दख्खनचा सुभेदार म्हणून निवड झाली. खडकी या मलिक अंबराने वसवलेल्या एका लहानशा गावाचं नाव शहाजहान बादशहाने औरंगाबाद असं केलं आणि इथं दख्खनची राजधानी ठरवून दिली.
इथं काही काळ गेल्यावर आपल्याशी वडील पक्षपाती वृत्तीने वागत आहेत, दारा शिकोहशी असलेली स्पर्धा यामुळे 1644 साली त्याने अचानक ही सुभेदारी सोडली यामुळे शाहजहानची त्यावर खप्पामर्जीही झाली. अखेर त्याच्या पुढच्यावर्षी राजकुमारी जहाँआरा हिच्या विनंतीनंतर औरंगजेबाला 1645 साली गुजरातची सुभेदारी मिळाली ती त्याने 1647 पर्यंत चालवली.
अफगाण प्रांतात
1647 साली त्याला हिंदुकुश पर्वतराजीत बल्ख प्रांतात पाठवण्यात आलं. तिथं अनेक घनघोर लढाया झाल्यानंतर त्याने मुलतान आणि सिंध प्रांताची सुभेदारी घेतली.
या काळात त्याने कंदाहारच्या महत्त्वाच्या किल्ल्यावर दोनदा स्वाऱ्या केल्या. वेढे दिले, हल्ले केले मात्र त्याला यश आलं नाही.
परत दख्खन
वायव्य प्रातांत आलेल्या अपयशामुळे नामुष्की पदरात बांधून परतलेल्या औरंगजेबाला पुन्हा एकदा औरंगाबादला पाठवण्यात आलं.
यावेळेस पाच वर्षं राहून औरंगजेब 1658 साली परत उत्तरेत गेला. दख्खनच्या या दुसऱ्या सुभेदारीत त्यानं गोवळकोंडा आणि विजापूरच्या मोहिमा केल्या.
सत्ताप्राप्तीसाठी संघर्ष
1657 साली शाहजहानचा अंतकाळ जवळ येतोय हे लक्षात येताच मुघलांच्या रितीप्रमाणेच बादशहाच्या वारसांची चुळबूळ सुरू झाली. सम्राटपद मिळावं यासाठी आधीपासूनच डावपेच, कारवाया केल्या जात होत्या आता त्या उघड होऊ लागल्या. दारा शिकोह बादशहाच्या जवळचा आणि लाडका असल्यामुळे तो प्रमुख दावेदार होताच. त्यात गुजरातच्या तैनातीवर असलेला त्याचा भाऊ मुरादबक्षही हालचाली करत होताच.
1658 साली सत्ताप्राप्त करण्यासाठी औरंगजेब दख्खनमधून उत्तरेला निघाला. वाटेत लढाया करत मध्य भारत ओलांडत त्याला जावं लागलं. वाटेत सामूगड येथे दारा शिकोहच्या सैन्याशी त्याची अत्यंत मोठी लढाई झाली. या लढाईत त्याला मुरादची मोठी मदत झाली. औऱंगजेबाच्या सैन्यानं दाराच्या सैन्याला अक्षरशः कापून काढलं. दारा शिकोहला मैदानातून जीव वाचवून आग्र्याला पळावं लागलं. दाराने आग्र्याला न राहाता दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला.
औरंगजेबाने आग्र्याला जाऊन वडील राहात असलेल्या किल्ल्यालाच वेढा दिला. किल्ल्याचं पाणीही तोडलं. शाहजहानला कैदेत टाकून सगळी संपत्ती ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने दाराचा दिल्लीच्या दिशेने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. पण वाटेत मुराद बक्षशी बेबनाव झाल्यावर त्यालाही ग्वाल्हेरला तुरुंगात ठेवलं (आणि तीन वर्षांनी त्याला ठार मारलं.)
दारा शिकोह
शाहजहानने दारा शिकोहला सैनिकी मोहिमांपासून दूर ठेवलं
शाहजहानचं दारावर इतकं प्रेम होतं की, तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमांवर पाठवायला कायमच कचरायचा. दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील, असा शाहजहानचा प्रयत्न असे.
दारा शिकोहच्या आणि त्याच्या राजस्थानात लढाया झाल्या. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावर दाराने वायव्य प्रांतातून इराणला पळून जाण्याचा निर्णय घेतला. तसा तो त्या दिशेने गेलाही मात्र औरंगजेबाने त्याला पकडलेच.
दारा शिकोहला दिल्लीत आणून त्याला संपूर्ण शहरात अपमानास्पद पद्धतीने मिरवण्यात आलं. मग त्याचा शिरच्छेद करुन त्याच्या प्रेताचीही मिरवणूक काढली. त्याच्या मुलांनाही ठार केलं.
दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्राँसुआ बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.
बर्नियर लिहितात, "दाराला एका छोट्या हत्तिणीच्या पाठीवर, छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं. त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शिकोह बसलेला होता. त्या पाठी औरंगजेबाचा गुलाम नजरबेग नंगी तलवार घेऊन चालत होता.
दाराने पळून जायचा प्रयत्न केला, किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तत्काळ त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं, असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. जगातील सर्वांत श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानित होत होता. त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोटं बांधलेलं होतं आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता."
त्यानंतर शाह शुजा या आपल्या उरलेल्या भावाकडे औरंगजेबाने मोर्चा वळवला. बंगालमध्ये त्यांची कोंडी केल्यानंतर शाह शुजा आणखी पूर्वेला पळून गेला आणि तिथं रानटी टोळ्यांच्या हल्ल्यातच मारला गेला. अशा रितीने आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वांना औरंगजेबानं संपवून टाकलं.
कारकीर्द
औरंगजेबानं आपली कारकीर्द सुरू केल्यावर अनेक नियम तयार केले. नवीन वर्षाची सुरुवात नवरोजच्या ऐवजी रमझानच्यावेळी झालेल्या राज्यारोहणाचा उत्सव हा नववर्षाचा उत्सव ठरवला. दारू, मादक पेयांवर बंदी घातली. दरबारातून संगीत हद्दपार केलं. धार्मिक बाबतीत मत न पटणाऱ्या लोकांना सरळ ठार मारायला सुरू केलं. बोहरा धर्मगुरू सय्यद कुतुबुद्दिन यांनाही मारण्यात आलं. 5 जून 1659 रोजी त्याचा राज्याभिषेक झाला.
त्यानंतर त्याने सर्वदिशांना आपलं राज्य वाढवायला सुरुवात केली. एकीकडे दक्षिणेत शिवाजी महाराजांशी लढणं सुरू असताना पूर्वेला आसामपर्यंत त्याच्या हालचाली सुरू होत्या. हिंदूंवरील जकात कर दुप्पट करणे, हिंदूंच्या देवळांचा विध्वंस करण्याचे आदेशही त्याने दिले. हिंदू देवळांच्या अवशेषांवर मशीदीही बांधण्यात आल्या.
शीख धर्मियांशीही मुघलांचा संघर्ष वाढला. शीख धर्मगुरू गुरू तेग बहाददूर यांना दिल्लीत आणून हालहाल करुन मारण्यात आलं.
औरंगजेबाच्या दिलरसबानू, रहमतउन्निसा, औरंगाबादी महल आणि उदेपुरी महल या पत्नी होत्या. त्याला झेबुन्निसा, झिनतउन्निसा, झुबेदात उन्निसा, बद्रुन्निसा, मेहरुन्निसा या मुली होत्या. तर मोहम्मद आजम, मोहम्मद अकबर, मोहम्मद सुलतान, मोहम्मद मुअज्जम, मोहम्मद कामबक्ष हे पुत्र होते.
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी औरंगजेबाने सतत प्रयत्न केले. मोगलांनी मराठ्यांकडून कल्याण बंदर जिंकून घेतलं. कधी शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं, मग शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावलं. शिवाजी महाराजांनी कारतलबखानाला उंबरखिंडीत पराभूत केलं, सूरतेची लूट केली अशा घडामोडी सुरू राहिल्या. 1665मध्ये मिर्झाराजे जयसिंहांनी पुरंदरला वेढा दिला आणि शिवाजी महाराजांना तह करावा लागला. यात त्यांना आपल्या स्वराज्यातले 23 किल्ले द्यावे लागले. तसेच पुढच्या वर्षी त्यांना आग्र्यालाही जावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराज
आग्रा येथे शिवाजी महाराजांना कैदेत टाकल्यानंतर अत्यंत चातुर्याने महाराजांनी सुटका करून घेतली.
परत आल्यावर शिवाजी महाराजांनी एकेक किल्ले आणि जवळचे खानदेश, वऱ्हाड हे प्रांत लुटले. किल्ले जिंकले, पुढे 1674 साली राज्याभिषेकही करवून घेतला. मग इतर प्रदेशही त्यांनी जिंकून घेतले 1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाले.
छ. संभाजी महाराज आणि पुढे
1681 साली औरंगजेबाचा पुत्र अकबराने स्वतःला राज्याभिषेक करुन बंड केले मात्र ते अपयशी ठरल्यामुळे त्याला महाराष्ट्रात यावं लागलं. मग औरंगजेबानेच पुन्हा दख्खनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 1682 साली तो औरंगाबादला आला. मुघलांनी गोवळकोंडा, हैदराबाद, माळवा, विजापूर असे एकेक प्रांत जिंकून घेतले. राजपुत्र अकबराने इराणला पलायन केलं.
1689 साली औरंगजेबानं छ. संभाजी महाराजांना कैद करुन त्यांना हालहाल करुन क्रूरपणे त्यांचा शिरच्छेद केला. महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना कैद केलं. त्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकायला सुरुवात केली.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याची सूत्रं घेतली. त्यांच्याशीही संघर्ष सुरूच राहिला. हा सततचा संघर्ष किल्ले घेणं, गमावणं, प्रदेश गमावणं, लूट करणं किंवा आपल्या संपत्तीची लूट होणं हा क्रम औरंगजेबाच्या अखेरपर्यंत सुरू राहिला.
अंतकाळ आणि एकाकी शेवट
औरंगजेब बादशहा असला तरी त्याच्या आयुष्याचंं शेवटचं दशक फक्त दुःखानंच भरून गेलं होतं. एकाकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली. इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळालं असलं तरी तेवढीच जास्त दुःखं त्याच्या वाट्याला आली.
त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला. आवडती सून 1705 साली मृत्युमुखी पडली. मुलगी झेबुन्निसाने आत्महत्या केली. त्याची बहीण गौहरआराही 1706 साली निधन पावली. 1706 साली त्याची दुसरी मुलगी मेहरुन्निसा व जावई वारले. मग त्याचा नातूही वारला. 1707मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे 2 नातू वारले. असं दुःख, एकटेपण, वैफल्य यांना कवटाळून त्याला मृत्यू पत्करावा लागला.
मृत्यू दख्खनमध्येच
औरंगजेबाचा अहमदनगरजवळ भिंगार येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.
कारण, मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.
याविषयी इतिहासकार डॉ. दुलारी कुरैशी सांगतात, "औरंगजेबानं इच्छापत्र लिहिलं होतं. त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिलं होतं की, माझे गुरू हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा. झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते.
पण, औरंगजेब वाचन खूप करायचा. त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं. मग औरंगजेबानं सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची."
ही कबर कशी असावी, याविषयीही औरंगजेबानं मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं.
कुरैशी सांगतात, "माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं. एवढीच औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा. त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली."
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. ते लाकडात बांधलेलं होतं.
त्यानंतर मग 1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले. आणि त्यांना वाटलं की, इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली.
औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिलं आहे की, औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला....
मुघल बादशहांमधील एका शक्तीशाली बादशहाचं मन ज्या दख्खन एकाच शब्दानं आयुष्यभर भारुन गेलं होतं. त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आलं नाही. तो इथंच सुपुर्द ए खाक झाला....
Published By- Priya Dixit