एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं होतं. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजपानं सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप आणि कोर्टकचेरी झाली. अखेर सुप्रिम कोर्टाच्या निकालातून हे सरकार तरलं. मात्र आता जनतेच्या कोर्टात या सरकारचा पराभव होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचा विजय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एका सर्व्हेमधून याबाबतचं उत्तर समोर आलं आहे.
महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्या तर शिंदे-फडणवीस सरकारच्या अडणची वाढू शकतात. राज्यात आज निवडणुका झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षांच्या समावेश असलेल्या महाविकास आघाडीला तब्बल ४७.७ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. काँग्रेसला १९.९ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १५,३ टक्के आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२.५ टक्के मतं मिळू शकतील. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के एमआयएमला ०.६ टक्के बीआरएस पक्षाला ०.५ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सकाळ वृत्तपत्र समुहाने हा सर्व्हे केला आहे.
सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरणार आहे. या सर्व्हेनुसार भारपाला महाराष्ट्रामध्ये ३३.८ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला ५.५ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना मिळून ३९.८ टक्के मतं मिळतील. ही मतं महाविकास आघाडीला मिळणाऱ्या मतांपेक्षा तब्बल आठ टक्क्यांनी कमी आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor