आज भाजपकडून शक्तिप्रदर्शन करत कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, यावेळी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी का देण्यात आली नाही? अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरून भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, "वेळ आहे उमेदवार बदलता येईल" असे सूचक विधान केले. त्याआधी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, "48 तासांमध्ये उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का?" असे आव्हान महाविकास आघाडीला केले होते.
आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळक कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. त्यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल," असे म्हणत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
Edited By- Ratnadeep Ranshoor