Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस 'मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं' असं का म्हणाले?

देवेंद्र फडणवीस 'मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं' असं का म्हणाले?
, बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:42 IST)
नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही."
 
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली, सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली.
 
मात्र, फडणवीसांनी असं वक्तव्य करण्याचं प्रयोजन काय होतं? त्यांना या वक्तव्यातून काय संदेश द्यायचा होता? कुणाला इशारा होता का? अशा काही प्रश्नांचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला आहे.
 
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, हे पाहूया.
 
मला असं वाटतं, मी आजही मुख्यमंत्री आहे - फडणवीस
नवी मुंबईत महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस भाषण करताना भाजप आमदार मंदा म्हात्रे, भाजप नेते गणेश नाईक, नरेंद्र पाटील यांना उद्देशून म्हणाले, "तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यानं मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. कारण त्याची कमतरता तुम्ही जाणवू दिली नाहीत. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो, हे महत्त्वाचं आहे."
फडणवीस म्हणाले, "गेली दोन वर्षे एकही दिवस घरात न थांबता, मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे कधीही जनतेनं हे जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाहीय. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल, तेव्हा पहिल्यांदा गोवर्धनी मातेकडेच येईन."
 
देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या वक्तव्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आम्ही राजकीय विश्लेषकांशी बातचीत केली असता, या वक्तव्यातून निघणाऱ्या शक्यता आणि अर्थ विस्तृतपणे समजून घेऊ.
 
महाविकास आघाडीला इशारा?
महाविकास आघाडीला पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याआधी देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे असं वक्तव्य करण्याला काही अर्थ असू शकतात का, यावर बोलताना लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने म्हणतात, देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य प्रामुख्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधणारं आहे.
 
"उद्धव ठाकरेंवर जी टीका होते की, ते घरात बसून कारभार करतात. त्या पार्श्वभूमीवर मी कसा लोकांमध्ये फिरतोय आणि मी फिरत असल्याचं लोकांना आवडतंय, हे त्यांना सांगायचंय. त्यामुळे मुख्यमंत्री असताना लोक जितके प्रेम करत होते, तितकेच करतात," असा सांगण्याचा कल त्यांचा दिसतो.
 
मात्र, यातून महाविकास आघाडीला काही फरक पडेल किंवा तसा इशारा आहे, असं श्रीमंत माने यांना वाटत नाही.
 
कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागृत ठेवण्याचा प्रयत्न?
यातून सहाजिक अर्थ काढणं शक्य आहे, तो म्हणजे पक्षातील बाहेरून आलेल्यांना किंवा पक्षातीलच काही नेत्यांना पक्षांतरापासून दूर ठेवणं, पक्षात थांबवून ठेवणं, हे कारण असू शकतं का?
 
तर याबाबत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की, "निवडणुकीनंतर विरोधी बाकांवर बसलेल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागृत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करत राहावंच लागतं. मात्र, अशा आशा दाखवत असताना, संघटनात्मक पातळीवर त्या दृष्टीने प्रयत्न होतायेत का, हे महत्त्वाचं आहे."
 
"भाजपमध्ये आलेले काही लोक सत्तेशिवाय जगू शकत नाही, असे आहेत. त्यामुळे त्या लोकांना धरून ठेवायला, आपलं सरकार येणार आहे, मी मुख्यमंत्री होणार आहे, असं चित्र निर्माण करणं भाजपची अपरिहार्यता आहे," असंही मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या.
 
मृणालिनी नानिवडकेरांच्या मताला दुजोरा देणं मत श्रीमंत माने मांडतात. ते म्हणतात, "सरकार पडतंय, हे सांगण्यात दोन वर्षे गेली. पुढल्या महिन्यात दोन वर्षे होतील. आता इतर पक्षातून आणलेले नेते टिकवून ठेवण्याचं आव्हान समोर उभं ठाकलंय. आपलं सरकार येतंय, याचा विश्वास त्यांच्यात जागृत ठेवणे त्यांना आवश्यकच आहे. तसं ते करतायेत."
 
मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीर बोलण्याचा अर्थ काय?
मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळातील सर्वात मोठा नेता बनवला. ती आकडेवारी पाहता ते सर्वात लोकप्रिय नेते होते. आजही तसे आहेत का, यासाठी त्या धर्तीची निवडणूक व्हावी लागेल.
 
"मुंबई महापालिकेतही भाजपनं शिवसेनेच्या बरोबरीत जागा मिळवल्या होत्या. आता देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता आणि त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा तोच आहे का, हे कदाचित मार्च 2022 मध्ये बीएमसी निवडणुकीच्या निमित्तानं कळेल.
 
"त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर फडणवीस म्हणत असतील की, लोक मला मुख्यमंत्री म्हणून वागवतात, तर त्यात गैर वाटत नाही. नेत्यांनी हे जाहीरपणे बोलावं का हा वादाचा मुद्दा आहे."
पण राजकारणात आपल्या महत्त्वकांक्षा अशा जाहीर करायच्या नसतात, असं अनेकदा राजकीय नेते सांगत असतात. मग देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीर बोलण्याच्या धाडसामागचं कारण काय असावं?
 
तर याबाबत श्रीमंत माने म्हणतात, "भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची महाराष्ट्रातील नेतृत्त्वासाठीची पहिली पसंती आपणच आहोत, हे देवेंद्र फडणवीसांना माहित असल्यानं ते निर्धास्तपणे आपल्या मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीरपणे बोलतात. फडणवीसांना माहित आहे की, सत्तेत असो वा नसो, आजच्या घडीला महाराष्ट्र भाजपचं नेतृत्त्व आपणच करणार आहोत."
 
हाच मुद्दा घेऊन आम्ही भाजपअंतर्गत फडणवसींना अशा वक्तव्यानं विरोधक वाढतील, याची भीती नाही का वाटत, हे चाचपडून पाहिलं.
 
फडणवीसांना पक्षाअंतर्गत विरोधाची भीती नाही का?
मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "आजच्या घडीला भाजपमध्ये चित्र असं आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच भाजपचे प्रत्येक राज्यातले निर्विवाद नेते आहेत. अशावेळी मोदी आणि शाह यांचं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना साथ असल्याची दिसून येते."
 
"त्यात भाजपमधील काही नेते ताकदीनं उभे राहत असले, तरी महाराष्ट्रातील भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या तोडीचा नेता दिसत नाही," असंही नानिवडेकर म्हणतात.
तर श्रीमंत मानेही सांगतात की, "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहातील, महाराष्ट्र भाजपचं नेतृत्त्व करतील, हे भाजपच्या संघटनेनं स्वीकारलंय आणि मान्य केलंय. त्यामुळे फडणवीसांच्या अशा वक्तव्यांची टिंगळटवाळी पक्षाअंतर्गतही केली जाणार नाही. कारण अन्यथा मोदींची नाराजी पत्कारावी लागेल."
 
महाराष्ट्रात संघटनेसाठी पहिली पसंती चंद्रकांत पाटील आणि सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस हेच केंद्रीय भाजप संघटनेनं संदेश दिल्याचं वारंवार दिसून येतं, असंही श्रीमंत माने म्हणतात.
 
देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रिपद
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत पहिल्यांदाच बोलून दाखववलंय, अशातलाही भाग नाही. आतापर्यंत अनेकप्रसंगी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केलाय की, मुख्यमंत्रिपदी पुन्हा येणं हे आपलं स्वप्न आहेच.
 
सुरुवात झाली ती 2019 साली मुख्यमंत्री असताना आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. 'मी पुन्हा येईन'ची कविता म्हटली आणि त्यातून आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.
 
2019 चे निकाल जाहीर झाल्यानंतर 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. मात्र, सत्तेची समीकरणं फिस्कटली आणि शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार बनवलं.
 
यावेळी शिवसेना-भाजपची युती तुटण्याचं कारणही मुख्यमंत्रिपदाची खुर्ची होती, हे एव्हाना लपून राहिलेलं नाही. आणि भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्थातच देवेंद्र फडणवीस होते. अजित पवारांसोबत पहाटे पहाटे शपथ घेऊन, त्यांनी ते स्पष्ट केलेही होते. मात्र, तेही पुढे फिस्कटले.
 
त्यानंतर मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या मुलाखतीतही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर काय वाटलं, हे सांगितलं होतं.
2019 च्या निकालानंतर भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदारांचा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, शिवसेनेनं भाजपचं सत्तेचं स्वप्न धुळीस मिळवलं.
 
त्यानंतर राजू परुळेकरांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले होते की, "ज्यावेळी माझ्यासह सर्वांना वाटत होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे, त्यावेळी झालो नाही. याचं दु:ख वाटलंच कारण हे अनपेक्षित होतं. सगळं हाती असताना हे झालं कसं याचं आश्चर्य वाटलं. दहा-बारा दिवस लागले यातून बाहेर येण्यासाठी."
 
त्यामुळे एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत नवी मुंबईत केलेलं वक्तव्य पहिल्यांदाच नव्हतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना, असं वक्तव्य केल्यानं त्याला वेगळं महत्त्वं प्राप्त झालंय. आता फडणवीसांच्या वक्तव्याची दखल महाविकास आघाडीतील नेते कसे घेतात आणि त्यास भाजप कसं प्रत्युत्तर देतं, हे येणारा काळच सांगेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात मंगळवारी 2,069 नवीन रुग्णांची नोंद तर 3,616 रुग्ण कोरोनामुक्त