Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात? दाढी का ठेवतात? चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

eknath shinde
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (09:24 IST)
मुंबई – परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना  बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकंदरीतच सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले.. त्यांच्यासोबत सेल्फी घेताना तेही त्यांच्यातलेच एक होऊन गेले.
 
पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात, दाढी का ठेवतात, शिक्षकांचा मार खाल्ला होता का..मुलांनी विचारलेल्या या भन्नाट प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली. परळच्या डॉ. बोर्जेस रस्त्यावरील डॉ. शिरोडकर विद्यालयाच्या सभागृहात केजी पासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे विद्यार्थी जमले होते. निमित्त होते बालदिनाचे. मुख्यमंत्री सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रे, गुलाबाच्या फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
 
बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाच असून त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या येतात त्यामुळे लहानपण देगा देवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
 
शिक्षकांचा मार खाल्ला का..?
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले त्यालाही त्यांनी तितक्याच मोकळेपणाने उत्तरे देखील दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे याचा अनुभव सांगतानाच लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
लग्नासाठी काढली दाढी..
तुम्ही दाढी का नाही करत असा प्रश्न विचारल्यावर माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे दाढी ठेवायचे त्यामुळे मी देखील दाढी ठेवली. लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे सांगतानाच दाढीची कमाल आणि किमया सगळ्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्री मिष्कीलपणे म्हणाले.
पांढरा रंग आवडतो कारण…
मला पांढरा रंग आवडतो कारण तो सगळ्या रंगात सामावून जातो असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले तर मराठी शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा ओढा वाढला पाहिजे, स्पर्धात्मक जगात मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
 
मैदानी खेळ खेळावेत
मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला, पाहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाईलच्या जमान्यात देखील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. विद्यार्थी भविष्य असून ते या देशाचे, राज्याचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारताय हे पाहून चिमुकल्यांनी निरागसपणे त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sania Mirza: वयाच्या 6 व्या वर्षीच टेनिसपटू होण्याचं झालं होतं निश्चित