Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयंत पाटील ईडी चौकशीदरम्यान एकाकी पडले अशी चर्चा का सुरू आहे?

Jayant Patil
, बुधवार, 24 मे 2023 (08:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून सोमवारी (22 मे) साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. IL अँड FS कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती आहे. पण या चौकशीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष समोर आल्याची चर्चा सुरू आहे.
 
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतले मोठे नेते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्त्व आहे. पण ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील एकाकी पडल्याचं चित्र दिसून आलं. या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया तर दिल्या पण प्रत्यक्षात जयंत पाटील सोमवारी चौकशीदरम्यान एकटे होते आणि याला पक्षातली अंतर्गत गटबाजी कारणीभूत आहे का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रसमध्ये दोन गट आहेत ही चर्चा खरं तर नवीन नाही. पण जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने ही गटबाजी पहिल्यांदाच ठळकपणे दिसून आली असं जाणकार सांगतात. नेमकं हे प्रकरण काय आहे? जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचे राजकीय अर्थ का काढले जात आहेत? आणि याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
जयंत पाटील एकाकी पडले?
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या कंपनीच्या कथित कर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांची ईडीने सोमवारी (22 मे) सुमारे साडे नऊ तास चौकशी केली.
 
दुपारी साधारण बारा वाजता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयापासून काही पावलांवर असलेल्या ईडी कार्यालयात चालत पोहोचले.
 
यापूर्वी 12 मे रोजी जयंत पाटील यांना ईडीने उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ईडीकडे 10 दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार ते सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. पण त्यापूर्वी दक्षिण मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
अगदी सकाळी 8 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागातून विशेषत: मुंबई, ठाणे आणि सांगली या जिल्ह्यांमधून राष्ट्रवादी काँग्रसचे कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात पोहचले.
 
या परिसरात कार्यकर्त्यांनी काही पोस्टर्स लावले होते. जयंत पाटील यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू होती. ‘अपनी संघर्ष की तारीखे आबाद रखेंगे,लडाई ऐसे लढेंगे की विरोध भी याद रखेंगे’ असे संदेश लिहिलेले पोस्टर्स या भागात झळकत होते.
 
जयंत पाटील यांनी ट्वीट करून कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असे आवाहन सुद्धा केले पण मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांना समर्थन देण्यासाठी पोहचले होते.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा पक्ष कार्यालयात जयंत पाटील यांच्यासोबत होते. अगदी रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली.
 
कार्यकर्त्यांच्या या गर्दीतूनच जयंत पाटील ईडी कार्यालयात पोहचले. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचा एकही नेता त्यांच्यासोबत नव्हता.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, दिलिप वळसे-पाटील, राजेश टोपे, सुनील तटकरे यांच्यापैकी कोणीही दिवसभर प्रदेश कार्यालयाकडे फिरकलंही नाही. याबाबत कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळालं.
 
जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचं राज्याचं नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. अशावेळी कार्यकर्ते शक्तीप्रदर्शनासाठी तब्बल दहा तासांहून अधिक काळ जमले पण त्यांचं नेतृत्त्व करण्यासाठी किंवा त्यांना धीर देण्यासाठी पक्षाचा एकही मोठा नेता न दिसल्याने चर्चांना उधाण आलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने बीबीसी मराठीशी बोलताना नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, “काही नेत्यांनी आजे इथे येऊन आम्हाला धीर देणं अपेक्षित होतं. कोणीही नाही तरी सुप्रियाताई येतील असं आम्हाला वाटलं होतं. पण नेते आले नाहीत यामुळे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.”
 
विशेष म्हणजे, मुंबई आणि जवळच्या भागातल्या आमदारांनीही हजेरी लावली नाही. त्यामुळे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले असताना आमदार आणि नेते मात्र अनुपस्थित राहीले अशी चर्चा जोर धरू लागली. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत का? असाही प्रश्न उपस्थित झाला.
 
यासंदर्भात जयंत पाटील यांनाही प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “जे आले त्यांना धन्यवाद आणि नाही आले त्यांनाही धन्यवाद.”
 
ते पुढे म्हणाले, “मीच आमदारांना आवाहन केलं होतं की त्यांनी मुंबईत येऊ नये. त्यामुळे काही आमदार वाटेतून परत गेले. नेत्यांना पक्षाची कामं असतात. ते वेगवेगळ्या कामात व्यस्त असतात. त्यांनी इथे आलंच पाहिजे असं नाही. त्यांना विश्वास आहे की मी असं काही करणार नाही म्हणूनच ते आले नाहीत.”
 
मला अनेक नेत्यांचे फोन आले त्यांनी फोनवरून चौकशी केली असंही जयंत पाटील म्हणाले. परंतु अजित पवार यांचा फोन आला होता का? यावर मात्र त्यांनी नाही असं उत्तर दिलं.
 
खरं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा जयंत पाटील एकाकी पडल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
 
वाय.बी.चव्हाण सेंटर याठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता. शरद पवार यांनी आपल्या भाषणादरम्यानचं आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा केली. त्यावेळी अजित पवार यांनी आक्रमक आणि भावूक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया देण्यापासून थांबवलं.
 
शरद पवार यांच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. त्यावेळीही शरद पवार यांच्या या निर्णयाची कल्पना केवळ पवार कुटुंबियांनाच होती हे स्पष्ट दिसून आलं होतं. प्रदेशाध्यक्ष असूनही जयंत पाटील यांना याबाबत कोणताही माहिती देण्यात आली नव्हती.
 
अजित पवार काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच (23 मे) राष्ट्रवादीच्या कार्यलयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारले.
 
अजित पवार म्हणाले, “मी यापूर्वीही कोणत्याही नेत्याच्याबाबत स्टेटमेंट्स केलेले नाहीत. जयंत पाटील यांच्या एकट्याची चौकशी झालेली नाही. यापूर्वी भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांनाही बोलवलं होतं यांच्यावेळेसही तुम्ही दाखवा मी काही याबाबत वक्तव्य केली आहेत का. तुम्ही जाणीवपूर्वक असे अर्थ काढता. माझ्या घरातल्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने 22 धाडी पडल्या. मी स्पष्टीकरण दिलं आणि पुढे कामाला लागलो.”
 
जयंत पाटील यांना भेटल्यानंतर आम्ही चर्चा करू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
 
“राजकीय सूडबुद्धीने कोणावरही कारवाई करण्यात येऊ नये. केंद्रीय तपास यंत्रणांना काही संशय आला किंवा माहिती मिळाली तर तपास करण्याचा त्यांना अधिकार आहे.” असंही ते म्हणाले.
 
‘काही असेल ती किंमत मोजायची आमची तयारी’
जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अपेक्षेची पूर्तता करण्याची आमची तयारी नाही. काही असेल ती किंमज मोजा. आमचा रस्ता सोडणार नाही. या यातना सहन कराव्या लागतात याची चिंता आम्हाला नाही.”
 
तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ही कारवाई म्हणजे सत्ताधाऱ्यांचं दबावतंत्र आहे असा आरोप केला आहे.
 
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “90-95 टक्के विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होते ही तुमचीच माहिती सांगते. जो विरोधात आहे त्याला ईडीची नोटीस मिळते. यात अधिकाऱ्यांचीही चूक नाही. यामागे कोणता अदृश्य हात आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये या तपास यंत्रणा स्वायत्त होत्या.”
 
तर छगन भुजबळ यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं, “जयंत पाटील यांनी काहीही चुकीचं पाऊल उचललं नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे कितीही वेळा त्यांना चौकशीसाठी बोलवलं तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही.”
 
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या कारवाईमागे सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याची टीका केली आहे.
 
आदित्य ठाकरे म्हणाले, “जे सरकारविरोधात भूमिका घेतात त्यांच्यावर दबाव टाकला जातो. ही लोकशाही नाही.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट?
जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. इस्लामपूर मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार असून त्यांनी ते अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहीले आहेत. तसंच आघाडी सरकारच्या काळात ते ग्रामविकास मंत्रीही होते.
 
2008 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार सोपवला होता. तर 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी जयत पाटील यांची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यावेळी स्पर्धेत सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील अशा नेत्यांची नावं चर्चेत होती.
 
अजित पवार आणि जयंत पाटील असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याची चर्चा कायम सुरू असते. प्रदेशाध्यक्ष पद असो वा विरोधीपक्ष नेतेपद असो यात जयंत पाटील आणि अजित पवार ही दोन नावं आणि त्यांचं मत यात स्पर्धा असल्याचं दिसून येतं असं जाणकार सांगतात.
 
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण जवळून कव्हर केलेले ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, “जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या गटबाजीच्या राजकारणाची चर्चा आजही आहे. खरं तर ही पक्षासाठी संधी ही की अशा चर्चांना पूर्मविराम देण्याची पण यावेळेसही पक्षाने ती गमावली. जयंत पाटील यांच्या मागे पक्ष उभा आहे हे दाखवण्यासाठी नेत्यांनी येणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. त्यामुळे ही गटबाजी आणखी उघडपणे दिसली. यामागे अजित पवार हे कारण सुद्धा असू शकतं.”
 
ते पुढे सांगतात, “या गटबाजीचा लगेच काही थेट परिणाम पक्षावर होईल असं वाटत नाही. कारण शरद पवार हे पक्षाचं नेतृत्त्व आजही आक्रमकपणे करत आहेत. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे शरद पवार हेच प्रमुख आहेत. नजीकच्या काळात गटबाजीचा परिणाम दिसणार नाही.”
 
ईडीच्या चौकशीदरम्यान ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासोबत दिसले नाहीत यामागे आणखी एक कारण असू शकतं असंही भातुसे यांना वाटतं.
 
“आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. अजित पवार, भुजबळ, हसन मुश्रीफ, अनील देशमुख, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. इतरही नेत्यांना ही भीती असू शकते त्यामुळे कोणी धाडस दाखवलं नसेल. पण नेत्यांना एकजुटता दाखवण्याची ही संधी होती.”
 
शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही राष्ट्रवादीची गटबाजी समोर आली होती असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात.
 
पवारांच्या राजीनाम्याच्या वेळेस अजित हा निर्णय कसा योग्य आहे हे पटवून देताना दिसले. याउलट जयंत पाटील भावुक झालेले दिसले.
 
"शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी समिती नेमली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 नेते होते. या समितीच्या बैठकीत दोन प्रस्तावांवर चर्चा झाली. पहिला प्रस्ताव म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा आणि दुसरा प्रस्ताव म्हणजे राजीनामा स्वीकारला नाही तर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव. दुसर्‍या प्रस्तावाला अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. पण जयंत पाटील यांनी शरद पवारच अध्यक्ष राहिले पाहिजेत ही भूमिका घेतली. यावरून बैठकीत बाचाबाची झाली." असं सुधीर सूर्यवंशी सांगतात.
 
"शरद पवार यांना दुसरा पर्याय द्यायलाच नको अशी जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांचं मत होतं. शेवटी सर्रावानुमते हाच निर्णय अंतिम झाला. पण या बैठकीतही गटबाजी प्रकर्षाने दिसली. यापूर्वीही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या गटातील रस्सीखेच, मतभेद दिसले होते. अनेकदा जयंत पाटील यांच्याकडून अजित पवार गटातील नेमणुका डावलल्या जातात हे सुद्धा बोललं जातं. हीच गटबाजी आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीदरम्यान उघड पणे दिसली," असंही सूर्यवंशी सांगतात.
 
जयंत पाटील यांच्यावर काय आरोप आहेत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IL&FS कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं. हे कंत्राट सब कॉन्ट्रॅक्टरला (उपकंत्राटदार) देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी निगडीत कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. पाटील त्या कालावधीत राज्याचे गृहमंत्री होते.
 
IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकलेत. कंपनीचे एकूण 250पेक्षा अधिक सब्सिडिरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत. जमिनीच्या वादात जास्त नुकसानभरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत.
 
अर्थात हे सर्व आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले आहेत. ही माहिती चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. “माझा आतापर्यंत कधीही आयएल आणि एफएस या कंपनीशी कुठल्याही प्रकारचा संबंध आला नाही. ईडीला काही प्रश्न होते ते त्यांनी विचारले आणि मी त्यांना सहकार्य केलेलं आहे. ईडी चौकशीदरम्यान कोणतीही कागदपत्र किंवा बँकांची स्टेटमेंट्स त्यांनी मागितलेली नाहीत. मी त्यांना समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
आता आगामी काही दिवसांत जयंत पाटील यांच्या अडचणी वाढतात की त्यांना दिलासा मिळतो हे पहावं लागेल. पण यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा मात्र नव्याने सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी