सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केल्याने देशात सध्या खळबळ माजली आहे. अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसून हे धमकी देणारे नेमके कोण यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जर धमकी दिली जात असेल तर गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“अशा प्रकारच्या धमक्यांबाबत जर आदर पूनावाला ने काही वक्तव्य केलं असेल तर निश्चितच ते गंभीर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते आहे”.“ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष अशा प्रकारचा धमक्या देणार नाही. जर कोणी करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकाने खोलवर तपास करावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.अदर पूनावाला यांना सुरक्षा पुरवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “त्यांची सुरक्षा करणं सर्वांची जबाबदारी आहे. ते जनतेच्या सुरक्षेसाठी, देशासाठी काम करत असून त्यांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांची सुरक्षा करणं ही सर्वांची जबाबदारी आहे”.