ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीनमध्ये काहीच गडबड नसून ती निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला असतानाच त्याच कार्यक्रमात पवारांचे पुतणे व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधाभास निर्माण केला. लोकसभेची चर्चा आता बस्स झाली. तो निकाल कसा लागला कुणी लावला यावर चर्चा नको… उद्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल यासाठी कामाला लागा… ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असून ते स्वतंत्रच राहणार आहे. आपला पक्ष कुठेही आणि कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही. त्या उठलेल्या वावड्या होत्या असे सांगतानाच जातीयवादी पक्षांना थांबवण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत कशी येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. बेरोजगारी वाढली आहे, कंपन्या बंद होत आहेत, युवकांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे, कुठलाही घटक समाधानी नाही, अनेक जागा रिक्त आहेत. जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या सर्व ठराविक काळात भरल्या जातील असे आश्वासन देतानाच लोकांचा विश्वास संपादन करण्याचे कामही आपल्याला करायचे आहे असे पवार म्हणाले.
आज जल संकल्प दिन साजरा करत आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष होते त्यावेळी पाण्याचं महत्त्व आपल्याला कळते. त्यामुळे पाण्याचं महत्व आपल्याला पटवून द्यायचं, आहे असेही अजित पवार म्हणाले.