कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या संचालकाचे अपहरण करून लुटण्याचा कट संघातील काही कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.याप्रकरणी संघाचा शिपाई संशयित दुर्वास रमेश सावंत (रा. कोळणे, ता. मालेगाव) याच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि संघाचे ज्येष्ठ संचालक राजाराम धनवटे (रा. एकलहरे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघ मर्यादित येथे ते संचालक आहे.
संघाच्या कार्यालयात शिपाई असलेला संशयित दुर्वेश सावंत याच्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्डमध्ये सेव्ह केलेल्या संभाषणात प्रशांत जळगाव या मोबाइल नंबरवर २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कॉल रेकॉर्डिंग सुरू झाले.
या संभाषणात संशयित दुर्वेश याने एकास आमच्या संस्थेत एक वयस्कर संचालक आहे. त्यांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याची चेन, लॉकेट नेहमी असते. आपल्याला त्याचे लाख-दीड लाख रुपये मिळतील. चोरीचा प्लॅन होता. दोन व्यक्तींमध्ये होणार नाही. तिसऱ्या व्यक्तीची गरज होती. त्यासाठी कट्टा मिळेल का?, असे संभाषण असल्याची माहिती धनवटे यांना संघाच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
धनवटे यांनी तत्काळ मुंबईनाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत संशयिताच्या विरोधात कट रचणे, जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. संशयिताचा मोबाइल ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक लॅबमध्ये संभाषण तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.