शेतातील लाकडे जमा करून घराच्या पाठीमागे लाकडाचे सरण रचून त्यावर स्वत:ला तारेच्या सहाय्याने बांधून पेटवून घेत २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना चांदा-लोहारवाडी (ता. नेवासा) शिवारात घडली. रविवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनिल साहेबराव पुंड (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे.
अहमदनगर चांदा-लोहारवाडी-महालक्ष्मी हिवरा रस्त्यावर पुंड वस्ती आहे. येथील अनिल साहेबराव पुंड याने घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास लाकडाचे सरण रचले. त्यावर ठिबक सिंचनच्या जुन्या प्लॅस्टिक नळ्या अंथरून स्वतःला लोखंडी तार गुंडाळून पेटवून घेतले. पुढील तपास सहायक फौजदार काकासाहेब राख करीत आहेत.
दरम्यान, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली. अनिल पुंड याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor