Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युसूफ मेहेरअली : मुंबईचे महापौर ज्यांनी दिलेला ‘चले जाव’चा नारा गांधीजींनी वापरला

युसूफ मेहेरअली : मुंबईचे महापौर ज्यांनी दिलेला ‘चले जाव’चा नारा गांधीजींनी वापरला
, रविवार, 2 जुलै 2023 (13:44 IST)
“गांधी हे महात्मा आहेत. ते ब्रिटिशांना सांगतायेत की, बाडबिस्तरा घेऊन तुम्ही चालते व्हा. पण आम्ही ब्रिटिशांना सांगतो की, चालते व्हा. बाडबिस्तरा आमचा आहे. तो इथेच ठेवा. तो आम्ही तुम्हाला नेऊ देणार नाही!”
 
समाजवादी विचारवंत यदुनाथ थत्तेंनी नोंदवून ठेवलेलं हे विधान आहे युसुफ मेहेरअलींचं. 1942 साली पुण्यात पार पडलेल्या एका व्याख्यानामालेतलं. मेहेरअलींचं ब्रिटिशांविरुद्धचं आणि स्वातंत्र्याची ओढ व्यक्त करणारं हे विधान.
 
हे युसुफ मेहेरअली नक्की कोण, असा सहाजिक (दुर्दैवानं!) प्रश्न अनेकांना पडू शकतो. स्वातंत्र्य संग्रामातील अनामिकांच्या यादीतच जणू या महत्त्वाच्या माणसाला आपण ढकलून दिलंय.
 
आज आम्ही – बीबीसी मराठी – तुम्हाला याच युसुफ मेहेरअलींच्या प्रवासातील काही किस्से आणि त्यातून त्यांचं भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वंही सांगणार आहोत.
 
या व्यक्तीबद्दल तुमचं कुतुहल वाढवणारी माहिती सांगावी, तर हे तेच युसुफ मेहेरअली, ज्यांनी 1942 च्या महात्मा गांधींच्या नेतृत्त्वातील आंदोलनाला ‘चले जाव’ची घोषणा दिली आणि हे तेच युसुफ मेहेरअली, ज्यांनी ‘सायमन गो बॅक’ची घोषणा दिली. पुढे आपण या घोषणांच्या प्रसंग आणि इतिहासाबद्दल जाणून घेऊच.
 
खरंतर युसुफ मेहेरअलींचं मोठेपण सांगण्यासाठी इतर कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यांचं मोठेपण त्यांच्या त्यागवृत्तीत आणि प्रेरणादायी प्रवासातच आहे. पण प्रमाणपत्रही तितक्याच थोर व्यक्तीकडून असेल, तर ते मान्य करायला हवं. मुद्दा असा की, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अग्रगण्य आंदोलक आणि भारतातील समाजवादी चळवळीतील नेते एस. एम. जोशी यांच्यासाठीही युसुफ मेहेरअली गुरुस्थानी होते. किंबहुना, ‘मी. एस. एम.’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी युसुफ मेहेरअलींच्या आठवणींनाच अर्पण केलंय.
 
तर युसुफ मेहेरअली हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील आणि समाजवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचं, मात्र सध्या अनेकांना अपरिचित नाव.
 
23 सप्टेंबर 1903 रोजी जन्म आणि 2 जुलै 1950 रोजी निधन – असा काळाचा 47 वर्षांचा तुकडा त्यांच्या वाट्याला आला.
 
निधनावेळी तत्कालीन राजकीय-सामाजिक भोवतालात त्यांना असलेलं महत्त्वं आणि निधनावेळचं त्यांचं वय पाहता, ते अल्पायुषी ठरले, असं म्हणता येईल. पण या अल्पायुषी काळाच्या तुकड्यावरही युसुफ मेहेरअलींनी आपलं नाव ठसठशीतपणं कोरलं.
 
ज्याच्या संवेदनशीलपणाला देश-खंडांचं बंधन नव्हतं...
युसुफ मेहेरअलींच्या जीवनप्रवासातील महत्त्वाच्या काही टप्प्यांचा-प्रसंगांचा आढावा या लेखातून घेणार असलो, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व जसं त्यांच्या फोटोमुळे डोळ्यांसमोर उभं राहतं, तसं शब्दांतूनही उभं राहावं म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांच्या ‘डाली’ या व्यक्तिचित्र संग्रहातील शब्दच आपल्याला उसणे घ्यावे लागतील.
 
ना. ग. गोरे हे युसुफ या त्यांच्या जिवलग मित्राचं वर्णन किती मोजक्या शब्दात करतात!
 
गोरे लिहितात – ‘स्वच्छ, सडपातळ शरीर. बुद्धिशाली आणि सदा हसतमुख चेहरा. मस्तकावर मधोमध विभागलेले केस, लगबगीचे चालणे, पोलादाच्या पात्यासारखी हवी तशी वाकणारी भाषा आणि ती तुझ्या मनातील संस्कारिता व्यक्त करणारी हाताची बोटे. मी क्वचितच इतकी बोलकी बोटे पाहिली आहेत! आणि दुसरी विलक्षण गोष्ट म्हणजे तुझे डोळे! चष्मा लावणारांचे डोळे मला कधी आकर्षक वाटत नाहीत. चष्मा चढवला की मनुष्य अधिक वृद्ध दिसू लागतो, गंभीर भासू लागतो. पण चष्म्यामागूनसुद्धा तुझे डोळे असे काही हसत, असे सौम्य, शीतल आणि आश्वासक तेज त्यांतून चमके तुझी ती बोटे आणि डोळे म्हणजे तुझ्या हातून कोणतेही मलिन, दुष्ट अथवा अनार्य वर्तन घडणार नाही याची जणू ग्वाहीच होती.’
युसुफ मेहरअली मूळचे कच्छचे. आता हा भाग गुजरात राज्यात आहे. तत्कालीन बॉम्बे प्रांतानजिकचा इलाखा. कच्छमधील भद्रेश्वर हे त्यांचं जन्मगाव. मात्र, युसुफ मेहेरअलींची कर्मभूमी तत्कालीन बॉम्बे, म्हणजेच आताची मुंबई.
 
बॉम्बे किंवा मुंबई हे खरंतर त्यांच्या केवळ आंदोलनांसाठी सक्रीय राहण्याची ठिकाणं. अन्यथा, अखंड मानवजातीचा विचार करणारा हा माणूस. भारतीय स्वातंत्र्य लढा असो वा स्पेनमधील लोकशाहीवाद्यांच्या लढाईस पाठिंबा असो, युसुफ मेहेरअलींच्या संवेदनशील मनाला देश-खंडांच्या सीमांचं बंधन नव्हतं.
 
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा म्हणतात, 1932-35 या काळात स्पेनमध्ये लोकशाहीवाद्यांनी हुकुमशाहीविरुद्ध जो लढा चालवला, त्याला भारतीयांनी पाठिंबा यासाठी युसुफ मेहेअरलींनी मुंबईत सभा घेतल्या.
 
1938 साली जेव्हा हिटलरनं ऑस्ट्रियावर हल्ला केला आणि तो देश गिळंकृत केला. तेव्हा हिटलरचं हे हुकूमशाही राजवटीचं संकट संपूर्ण जगावर कोसळणार, या जाणीवेतून युसुफ मेहेअरलींनी हिटलरचा निषेध करण्यासाठीही मुंबईत सभा घेतल्या होत्या.
 
अशा या मानवमुक्तीच्या विचारांनी भारलेल्या माणसाची सुरुवात झाली ती ऐन तारुण्यात. ज्या वयात मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतात, त्यावेळी युसुफ मेहेअरली यांच्यात राष्ट्रीयता आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याची भावना जागृत झाली होती. त्यातूनच बॉम्बे युथ लीगची स्थापना झाली.
 
बॉम्बे युथ लीग आणि ‘सायमन गो बॅक’ची घोषणा
भारतात फार कमी लोकांना माहित आहे की, ‘सायमन गो बॅक’ या घोषणेचे जनक युसुफ मेहेरअली आहेत. पण या घोषणेचा जन्म कसा झाला, हे आपण थोडक्यात पाहू. कारण या घोषणेचा संबंध जसा ‘सायमन’शी आहेत, तसाच मेहेरअलींच्या नेतृत्त्वातील बॉम्बे युथ लीगमध्येही आहेत. त्यासाठी आपल्याला 1928 च्या आसपासच्या घटनांचा आढावा घ्यावा लागेल.
 
झालं असं की, ब्रिटिश सरकारनं 1928 साली भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबवण्यासाठी पूर्वअभ्यास म्हणून जॉन सायमन यांच्या अध्यक्षेत आयोग नेमला. पुढे सायमन आयोग म्हणून ओळखला गेला तो हाच.
 
या आयोगाचे सगळे सदस्य ब्रिटीशच होते. त्यात कुणीही भारतीय नव्हता.
 
भारतातल्या राज्यकारभाराबाबतच्या सुधारणा केवळ ब्रिटिशांनी ठरवाव्यात, हे भारतीयांना खटकलं आणि या आयोगावर बहिष्काराचा ठराव काँग्रेसनं केलं.
 
लाहोरमध्ये तर फारच उग्र निदर्शनं झाली. लाहोरमध्ये या निदर्शनाचं नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांना पोलीस लाठीमारात दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा प्राण गेला. यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली. लजपतराय यांचं हौतात्म्य युसूफ मेहेरअलींच्या जिव्हारी लागलं. त्यांच्या भाषणांमधून ही तळमळ दिसत असे, असं ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा लिहितात.
 
सायमन कमिशनविरोधातील संतापाची लाट भारतभरात पोहोचली होती.
 
जॉन सायमन यांच्यासह सायमन कमिशनचे सदस्य जेव्हा मुंबई बंदरात पोहोचले, ती तारीख होती 3 फेब्रुवारी 1928.
 
सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी बॉम्बे युथ लीगनं भल्या पहाटेच बंदरावर जाऊन निदर्शनं सुरू केली. या बॉम्बे युथ लीगचे नेते होते युसुफ मेहेरअली. इथेच युसुफ मेहेरअलींनी ‘सायमन, गो बॅक’ ही घोषणा पहिल्यांदा दिली. पुढे भारतभरात सायमन कमिशन जिथं जाईल, तिथं हीच घोषणा दिली गेली. किंबहुना, सायम कमिशनविरोधातील आंदोलनाचं ते जणू ब्रीदवाक्यच झालं.
 
इथे ज्या बॉम्बे युथ लीगचा उल्लेख आला, तिच्या स्थापनेत युसुफ मेहेअरलींचा वाटा मोठा होता. किंबहुना, मेहेरअलींच्याच पुढाकाराने ही संघटना स्थापन झाली होती.
 
डिसेंबर 1927 मध्ये बॉम्बे युथ लीगची स्थापन झाली होती. बॉम्बे प्रांतातील तरुण-तरुणींना समान ध्येयासाठी एकत्र आणणं, हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसह अनेक पुरोगामी विचार या युथ लीगच्या जन्माचं कारण होतं.
 
एस. एम. जोशी वगैरे मंडळींनीही या युथ लीगच्या कामात रस घेतला होता. एस. एम. जोशींनी त्यांच्या आत्मचरित्रात या युथ लीगच्या कामाचा उल्लेखही केला आहे.
 
आपण बॉम्बे युथ लीगच्या स्थापनेचं वर्ष (1927) पाहिलं, तर लक्षात येतं की, युसुफ मेहेरअली यांना फार कमी वयात स्वातंत्र्याचं भान आलं होतं. 1903 चा जन्म असलेल्या मेहेरअलींनी वयाच्या विशी-एकविशीतच स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आंदोलनं, निदर्शनांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली होती. म्हणजे, महाविद्यालयीन काळातच.
 
मुंबईतल्या एलफिन्स्टन कॉलेजमधून इतिहास आणि अर्थशास्त्रातून युसुफ मेहेरअलींनी पदवीचं शिक्षण घेतलं होतं. पुढे त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. मात्र, स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनांच्या सहभागामुळे कायद्याची पदवी काही त्यांच्या हातात पडली नाही.
 
1930, 1932 आणि 1942 अशा तीनवेळा त्यांनी तुरुंगाची वारी केली.
 
यातील 1942 चा तुरुंगावास लाहोरमध्ये होता. तिथूनच त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. मेहेरअलींचा विजय महत्त्वाचा ठरला, कारण 1934 साली मेहेरअली आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली होती. काँग्रेसअंतर्गतच समाजवादी विचारांच्या नेत्यांचा हा गट होता.
 
मेहेरअलींच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधून काहीजणांचा त्यांना विरोध होता, मात्र तरीही ते निवडून आले. ते निवडून आले, याचा अर्थ बॉम्बे प्रांताचं राजकारण ज्यांच्या आदेशावर चाले, त्या सरदार पटेलांचा मेहेरअलींना पाठिंबाच होता, असं मानलं गेलं.
 
महापौर असतानाच मुंबईत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं शेवटचं सर्वात मोठं आंदोलन झालं. आणि इथेच युसुफ मेहेरअलींनी ‘ती’ ऐतिहासिक घोषणा दिली. त्याबद्दल जाणून घेऊ.
 
मुंबईचा महापौर आणि ‘चले जाव’ची घोषणा
8 ऑगस्ट 1942 ची संध्याकाळ. मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखोंच्या संख्येत जनसमुदाय जमला होता. स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वांत मोठ्या लढ्याची घोषणा इथून होणार होती. मैदानभर स्वातंत्र्याच्या ध्येयानं भारावलेला जनसमुदाय होता. त्यांच्यासमोर 73 वर्षांचा एक वृद्ध उभा राहिला. समोरचा जनसमुदाय कानात जीव आणून ऐकू लागला.
 
या वृद्धानं इशारा देण्याची कृती करून हात उंचावत 'करेंगे या मरेंगे'च्या निर्धारानं घोषणा दिली आणि या घोषणेनं ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेचा शेवटचा अंक सुरू झाला. ती घोषणा होती - 'Quit India'
 
आणि घोषणा देणारे वृद्ध होते - मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी
 
चले जाव (Quit India) च्या घोषणेनं जमलेल्या जनसमुदायात विजेची लहर पसरली. ब्रिटिशांविरोधातल्या घोषणांनी निनादणाऱ्या मुंबईच्या अवकाशातला सूर्य स्वातंत्र्याची पहाट उगवण्याचं स्वप्न दाखवत मावळतीकडे झुकू लागला.
 
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं सर्वांत मोठं आंदोलन म्हणून 'चले जाव'ची नोंद होते. या आंदोलनात असंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवला. देशभरातील तुरुंगच्या तुरुंग भरले. भूमिगत आंदोलनांनी ब्रिटिशांना हैराण करून सोडलं.
 
ही 'चले जाव'ची घोषणा दिली होती युसुफ मेहेरअलींनी.
14 जुलै 1942 रोजी वर्ध्यात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' हा ठराव इथंच झाला. यानंतर महिन्याभरातच म्हणजे 7 आणि 8 ऑगस्टला मुंबईत पार पडलेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीत ठराव मंजूर झाला. आणि या ठरावाची घोषणा गवालिया टँक मैदानातील ऐतिहासिक जाहीर सभेतून करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली ही सभा रात्री 10 वाजता संपली.
 
या सभेत चौघांची भाषणं झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांचं पहिलं भाषण झालं, मग पंडित नेहरूंनी काँग्रेस कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले. नंतर नेहरूंनी मांडलेल्या ठरावांना अनुमोदन देणारं भाषण सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं.
 
चौथे वक्त होते महात्मा गांधी. या सभेत महात्मा गांधींनी एकूण तीन भाषणं केली. यातलं एक भाषण इंग्रजीत होतं आणि त्यातच त्यांनी 'Quit India' ही प्रसिद्ध घोषणा केली.
 
या 'Quit India'चे पुढे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले. जसं या घोषणेला हिंदीत 'भारत छोडो' आणि मराठीत 'चले जाव' म्हटलं गेलं.
 
ब्रिटिशांना भारत सोडण्याचा अखेरचा इशारा देणारी घोषणाही खमकी हवी, म्हणून महात्मा गांधींनी निर्धार व्यक्त करणाऱ्या घोषणेच्या शोधासाठी अनेकांशी चर्चा केली. तेव्हा बरेच शब्दप्रयोग समोर आले.
 
त्यातील एक होतं 'Get Out'. पण या शब्दात उद्धटपणा अधिक दिसत होता. त्यामुळे गांधींनी हे शब्द नाकारले.
 
त्यानंतर सरदार पटेलांनी 'Retreat India' आणि 'Withdraw India' असे दोन शब्द सूचवले. मात्र, हे शब्दप्रयोगही फारसे आवडले नाहीत.
 
त्याचदरम्यान युसुफ मेहरअलींनी 'Quit India' हा शब्द सूचवला आणि महात्मा गांधींनी तो तात्काळ मान्य केला.
 
या काळात युसुफ मेहरअली काँग्रेसमध्येच सक्रीय होते. काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या नेत्यांमधील ते प्रमुख नेते होते. तसंच, या ऐतिहासिक आंदोलनाची हाक जिथं दिली गेली, त्या मुंबई शहराचे ते विद्यमान महापौर होते.
 
‘सौंदर्याचा उपासक’ काळाच्या पडद्याआड
1942 च्या चळवळीत कारावासात असतानाच हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आणि सुटका झाल्यानंतरही त्यांचा हा आजार बळावत गेला. सहा-सात वर्षे ते आजाराशी झगडत राहिले आणि हा झगडा 1950 साली संपला.
 
2 जुलै 1950 रोजी त्यांचं निधन झालं.
 
सौंदर्याचा हा उपासक हे जग सोडून गेला. फक्त ‘सौंदर्याचा उपासक’ म्हणताना मेहेअरलींची सौंदर्याची व्याख्या स्पष्ट करावी लागेल.
 
युसुफ मेहेरअली म्हणत, ‘कुरुपतेचा मला तिटकारा वाटतो. मी सौंदर्याचा उपासक आहे. त्यामुळेच मी पारतंत्र्य, विषमता आणि वैर यांचा तिटकारा करतो, आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी झटतो.’
 
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि समाजवादी नेते मधू दंडवते यांनी युसुफ मेहेरअलींवर ‘युसुफ मेहेरअली : क्वेस्ट फॉर न्यू हॉरिझन्स’ नावाचं चरित्र लिहिलंय. कुमुद करकरे यांनी ते मराठीत अनुवादित केलंय. या चरित्रातील शेवटच्या प्रकरणातला एक परिच्छेद मेहेरअलींच्या जीवनाचं सार मांडणारं आहे. त्याच परिच्छेदानं या लेखाचाही शेवट व्हावा.
 
दंडवते लिहितात – ‘युसुफ मेहेरअलींचे छोटेसे आणि लोभसवाणे आयुष्य अनेक बाजूंनी मोहरलेले होते. माणसाचे आयुष्य वर्षात न मोजता त्याच्या हातून घडलेल्या मौलिक कृतींनी त्याचे मूल्यमापन करायचे असेल, तर मेहेरअली एक परिपूर्ण आणि सार्थ जीवन जगले असे म्हणावे लागेल.’



Published By-Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nagpur Accident : कारचा अपघात होऊन कार पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर, 5 जखमी