मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मशिदीवरील लाऊडस्पीकरवर अजान ऐकू आल्यास त्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहनं केलं.
त्यानंतर 3 मे रोजी एक पत्रक प्रसिद्ध करत त्यांनी अॅक्शन प्लॅन जाहीर केला. त्यात मशिदींवरील भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास त्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन त्यांनी केलं.
त्यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा म्हटल्याचा दावा केला.
तसे व्हीडिओही त्यांच्याकडून शेयर करण्यात आले. बीबीसीनं मात्र अद्याप या दाव्याची पडताळणी केलेली नाही.
काही ठिकाणी हनुमान चालिसा पठण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचंही पाहायला मिळालं.
यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत "राज्यात 90 ते 92 टक्के ठिकाणी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही," असं म्हटलं.
असं असलं तरी, ज्या औरंगाबादच्या सभेतील वक्तव्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या औरंगाबादमध्ये मात्र राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा लावण्याच्या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.
संध्याकाळी 5 वाजेची अजान होईस्तोवर शहरात कुठेही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यात आल्याच्या बातम्या नाहीयेत.
पोलीस अधिकाऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
शहरात अजूनही कुठे अनुचित प्रकार घडलेला नाही. नेहमीप्रमाणे शांततेचं वातावरण आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्यांनं नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं.
पण, मग राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद का नाही मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. याची दोन प्रमुख कारणं असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. ती कारणं जाणून घेण्याआधी आम्हाला आज शहरात काय दिसलं, ते पाहूया.
आम्ही काय पाहिलं?
आम्ही सकाळपासून औरंगाबाद शहरात फिरत असताना, शहरातील आजचं वातावरण हे दररोजच्या प्रमाणे शांत असल्यासारखं दिसलं.
विद्यार्थी क्लासेससाठी जात आहेत, बाजार नेहमीसारखा सुरू आहे, लग्नाची तयारी सुरू आहे, असं नेहमीचं चित्र सगळीकडे दिसत होतं.
वेगळं होतं ते मात्र चौकाचौकातील पोलिसांचा बंदोबस्त. विशेषत: मशिदींकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. मशिदींसमोरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचं दिसून येत होतं.
शहरातील टाऊन हॉल परिसरातल्या लाल मशिदीजवळ आम्ही पोहोचलो, तेव्हा तिथंही पोलीस तैनात करण्यात आले होते.
नोटीस आणि परिणाम
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी 4 मेसाठी आणि तिथून पुढचा कार्यक्रम जाहीर केला.
औरंगाबाद पोलिसांनी मात्र राज यांच्या औरंगाबादमधील सभेपासूनच शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी योजना आखायला सुरुवात केली होती.
3 मे रोजीचं अल्टिमेटम लक्षात घेऊन औरंगाबाद पोलिसांनी शहरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली. पक्षाच्या नेत्यांच्या घरी जाऊन या नोटिशी त्यांना देण्यात आल्या.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं वक्तव्य अथवा कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं या नोटिशीत म्हटलं होतं.
या नोटिशीमुळेही मनसेचे स्थानिक पदाधिकारी अधिक सक्रिय दिसले नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांच्या मते, "एकतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिशी पाठवल्या होत्या आणि दुसरं म्हणजे औरंगाबादमध्ये मनसेचं संघटन कार्य काहीच नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या आवाहनाला शहरात प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये."
याशिवाय पोलिसांनाही सर्व मशिदीमधील धर्मगुरुंना सकाळची अजान लाऊडस्पीकरवर करू नका, असं सांगितलं होतं, असंही माने सांगतात.
पोलिसांच्या नोटिशीमुळे मनसेचे कार्यकर्ते अंडरग्राऊंड झाल्याचीही चर्चा सुरू होती.
याविषयी बीबीसी मराठीनं मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "आम्ही अंडरग्राऊंड नाही आहोत. ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला, त्या मनसे सैनिकांचे आम्ही आभार मानतो."
तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येऊ शकता, असंही ते म्हणाले.
'आवाज मोठा, ताकद कमी'
औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांच्या मते, "राज ठाकरे यांची सभा होण्याआधीच औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील सर्व मुस्लीम नेत्यांशी व्यक्तिगत चर्चा केली होती. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सद्यस्थितीतील सरकारच आपल्याला हवं. राज ठाकरेंना मोठं करायचं नाही, असं मुस्लीम समाजानं ठरवलं होतं. त्यामुळे मग मुस्लीम समाजाकडून काही प्रतिकार करण्यात आला नाही.
"याशिवाय हिंदू पट्ट्यात शिवसनेनं वातावरण टाईट केलेलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या आवाहनाला औरंगाबादमध्ये काहीच प्रतिसाद मिळाला नाही."
औरंगाबादमध्ये 20 ते 20 घरांएवढीच मनसेची ताकद आहे. त्यामुळे त्यांचा आवाज मोठा असला, तरी ताकद कमी आहे, असंही उन्हाळे पुढे म्हणाले.