Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबाद महापालिकेत दे दणादण

सत्ता युतीची; सभापती काँग्रेसचा

औरंगाबाद महापालिकेत दे दणादण
औरंगाबाद, , मंगळवार, 8 एप्रिल 2008 (10:49 IST)
WD
औरंगाबाद महानगर पालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत अक्षरशः रणकंदन माजले. सदस्यांच्या पळवापळवीमुळे संतप्त नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यातच बाहेरील गुडांनी सभागृहात प्रवेश करून घोषणाबाजी करीत सामानाची नासधूस केली. या धुमश्चक्रीत महापौर विजया रहाटकर यांच्यासह दोन नगरसेवक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गोंधळाचा फायदा घेत युतीची सत्ता असणार्‍या महानगरपालिकेच्या सभापतीपदी काँग्रेस नगरसेवकाची निवड झाली.
स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपा सेनेतर्फे संजय जोशी तर विरोधी पक्षातर्फे कॉंग्रेस आघाडीचे साजेद बिल्डर उमेदवार होते. स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यात भाजप-सेना आघाडीचे १० तर विरोधी पक्षांचे ६ सदस्य आहेत. असे असले तरी शिवसेनेचे पुरुषोत्तम ठाकूर हे भूमिगत झाले होते. भाजपा पुरस्कृत म्हणून निवडून आलेले कचरू सोनवणे व के. व्ही. मोरे हे दोन सदस्य विरोधकांना मिळाल्याचा संशय आल्यानंतर वाद सुरु झाला. दोन्ही नगरसेवक काँग्रेसचे दत्ताभाऊ पाथ्रीकर व जावेद हसन खान यांच्यापाशी बसले होते.
webdunia
WDWD
अर्ज मागे घेण्याच्या १५ मिनीटाच्या कालावधीत सर्व सदस्य उठल्यानंतरही सोनवणे व मोरे यांना उठू दिले नाही. भाजपचे नगरसेवक नारायण कुचे यांनी सोनवणे यांना बाहेर बोलवले असता जावेद हसन खान यांनी त्यास विरोध केला. तेव्हा प्रथम कुचे आणि जावेद खान यांच्या बाचाबाची सुरु झाली. त्याच वेळी बाहेरुन युवकांचा जमाव सभागृहात शिरला व त्यांनी सभागृहातील फर्निचरची तोडफोड करण्यास सुरवात केली. महापौर रहाटकर सभा तहकूब करून दालनात निघून गेल्या. मनपा अधिनियमानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सभा तहकूब करता येत नाही असा दाखला देत रशीदमामू व दत्ता भाऊ पाथ्रीकर यांनी सभा पुढे सुरु ठेवण्याचा आग्रह धरला. तेव्हा पुन्हा खडाजंगी सुरु झाली. याच घाईगर्दीत पाथ्रीरकर यांनी पर्यायी पीठासीन अधिकारी म्हणून रशिदमामू यांचे नाव पुकारले आणि सभा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा गोंधळ होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली. कचरु सोनवणे यांना बाथरूममध्ये बंद करण्यात आले होते. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अखेर आयुक्त असीमकुमार गुप्ता सभागृहात आले. बंदोबस्तासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. महापौर विजया ताई रहाटकर यांना किरकोळ मारहाण झाल्याने व छातीत लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सेनेचे नगरसेवक मोहन मेघावाले यांना माणिक हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. भाजपचे उमेदवार संजय जोशी यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले.
webdunia
WDWD
या गोंधळानंतर झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षनेता व काँग्रेस आघाडीचे साजेद बिल्डर यांची आठ विरूध्द शून्य मतांनी सभापतिपदी निवड झाली. काँग्रेस आघाडीला एकूण ८ मते मिळाली तर भाजपसेना युतीचे उमेदवार संजय जोशी यांना युतीच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्याने एकही मत मिळाले नाही. पीठासन अधिकारी रशीमामू यांनी साजेद बिल्डर यांची निवड झाली असे जाहिर केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi