टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योगाच्या सहकार्याने कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो. शेतीपूरक उद्योग आणि मुल्युवर्धित प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासनाने इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क योजना सुरु केली. यामुळे मध्यस्थांची साखळी दूर होऊन शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगणघाट येथे टेक्सटाईल पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
हिंगणघाटजवळ वणी येथे असलेल्या गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्सलटाईल पार्कचे भूमीपूजन आणि नवीन विस्तारित स्पिनींग युनीटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्स कंपनीचे अध्यक्ष वसंतकुमार मोहता, व्यवस्थापकीय संचालक प्रशांतकुमार मोहता, अनुरागकुमार मोहता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज उद्योगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सर्वाधिक सुलभता असणारे राज्य आहे असे लिकान यु या जागतिक स्तरावरच्या उद्योगाचे मानांकन ठरविणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. महाराष्ट्रातून एक वर्षात दीड लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असून देशातली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी गुंतवणूक झाली पाहिजे. आज राज्याच्या सकल उत्पानात शेतीचा वाटा केवळ अकरा टक्के आहे. मात्र यामधून 45 टक्के रोजगार निर्मिती होते. कृषी क्षेत्र जोपर्यंत उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडणार नाही तोपर्यंत कृषी क्षेत्रात बदल होऊ शकत नाही.
आज महाराष्ट्र हे कापूस उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात निर्माण होणाऱ्या कापसापैकी 25 टक्के कापसावर प्रक्रिया होते, उर्वरित 75 टक्के कापसावर पूरक उद्योगाच्या साखळी अभावी आपण प्रक्रिया करू शकत नाही. यासाठी इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कही योजना शासनाने सुरु केली असून त्यातील पहिला पार्क विदर्भातील हिंगणघाट येथे सुरु होत असल्याबाबत त्यांनी मोहता कुटूंबियाचे अभिनंदन केले. यापुढे उद्योजक शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी कापसाला चांगला भाव मिळेल. यामध्ये कुणाचीही मध्यस्थी नसल्यामुळे थेट शेतकऱ्याला कापसाची परिपूर्ती मिळेल. उद्योग आणि शेतकऱ्यांमध्ये सहकार्य असेल तर नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता येईल. कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुध्दा उद्योगाने संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हणाले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी शासन ‘फार्म टू फॅशन’ ही संकल्पना राबवित आहे. त्याचा प्रत्यय इंटिग्रेटेड टेक्सस्टाईल पार्कच्या माध्यमातून आज येत आहे. हिंगणघाट सारख्या छोट्या शहरात मोहता कुटूंबियांच्या सहा पिढ्यापासून कापड प्रक्रिया उद्योग सुरु आहे. यामध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या कापडाची निर्मिती होईल.
आमदार समीर कुणावार म्हणाले, आठ गुंतवणुकदारांनी मिळून ही इंटीग्रेटेड पार्कची संकल्पना साकारली आहे. यामध्ये 2 हजार 500 लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. हिंगणघाटच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 29 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली जाते. त्यामुळे हिंगणघाट हे कापूस उद्योगासाठी महत्वारोचे शहर आहे. हिंगणघाटचा कामगार कापूस उद्योगात निष्णात त्यामुळे कापड उद्योगासाठी इथे कुशल मनुष्यबळ मिळेल. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे हिंगणघाटसाठी नाट्यगृह आणि कामगारांसाठी 2 हजार घरांची योजना तयार करण्याची मागणी केली.
वसंतकुमार मोहता यांनी गिमाटेक्सी इंडस्ट्रीबाबत माहिती दिली. तर अनुरागकुमार मोहता यांनी इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कबाबत प्रस्तावना केली. यावेळी गिमाटेक्सल इंडस्ट्रीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘जी फोर्स’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.