Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

द्राक्ष बागाईतदारांनी जैविक कीडरोगनाशके वापरावीत - डॉ. सावंत

द्राक्ष बागाईतदारांनी जैविक कीडरोगनाशके वापरावीत - डॉ. सावंत
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (08:59 IST)
सध्याच्या पावसात द्राक्षबागेच्या छाटणीनंतर आणि गेल्या महिन्यात छाटलेल्या बागेच्या केवडा, भुरी आणि करपा रोग यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बुरशी रसायनांना दाद देत नाहीत. म्हणून ही समस्या टाळण्यासाठी द्राक्ष बागाइतदारांनी देशांतर्गत ग्राहकांसाठी रसायनांच्या वापरासोबत जैविक कीडरोग नाशकांचा वापर वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषिविज्ञान केंद्र आणि इंडोफील कंपनीच्या सहकार्याने पिंपळगाव बसवंत येथे गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले, सद्यस्थितीत देशांतर्गत बाजारपेठ मोठी असून त्या ग्राहकांनादेखील रसायन अंश मुक्त द्राक्ष उत्पादन करणे आवश्यक झाले आहे. द्राक्ष बागेत विविध प्रकारच्या जैविक कीडरोग नाशकांच्या वापराने रोगनियंत्रण तर होतेच, शिवाय त्याबरोबरच रासायनिक अंश देखील कमी झाल्याचे प्रयोगात आढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.
 
कृषिविज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी मेळाव्यामागची भूमिका स्पष्ट करताना, बदलत्या वातावरणाशी शेतकरी संघर्ष करीत असून, योग्य व्यवस्थापन पद्धती वापराबाबत आवाहन केले. शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून पिक उत्पादनातील जोखीम कमी करण्यास, द्राक्ष पिकासोबत काही जोडधंद्यांची आणि संरक्षित शेतीची गरज असल्याचे सांगितले. यासाठी केंद्रामार्फत विविध व्यावसायीक प्रशिक्षण सुरू असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
 
प्रारंभी प्रा. हेमराज राजपूत यांनी द्राक्ष खुंट कलमांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. सह्याद्री फार्मसचे संचालक विलास शिंदे ‘द्राक्ष निर्यातीसाठी संधी आणि काढणीपूर्व व नंतरचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. इंडोफिलचे डॉ. तिरुमला राव यांनीही यावेळी शेतकऱ्यांशी हितगुज करून कृषी रसायनांच्या वापराविषयी तांत्रिक माहिती दिली. मेळाव्यास विभागीय व्यवस्थापक जयंत नाग तसेच कृषीशास्त्रज्ञ डॉ. त्रिपाठी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक घाटगे यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐक्याच्या जोरावर देशाचा चेहरा-मोहरा बदला -शरद पवार