बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्राचे पाणी मोजण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र वाघ आहे. वाघाच्या शेपटीला हात लावू नका असा खणखणीत इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. परप्रांतीयांच्या मुद्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता आम्हाला घर पेटवायचे नसून घरातील चूल पेटवायची आहे, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेनेतर्फे मराठवाडातील बीड येथे आयोजित 'देता का जाता' कर्जमुक्ती मेळाव्यात ते बोलत होते. मराठवाडातील आठही जिल्ह्यातून तब्बल अडीच लाख नागरिकांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. बीडच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना धारेवर धरले. लालूंनी पानात तंबाखू टाकून पचापच पिचकार्या सोडू नये. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प रेंगाळत ठेवून बिहारला भरभरून देणार्या लालूंचे धोतर ओढा असे सांगतानाच त्यांनी बिहारात बसून महाराष्ट्राकडे डोळे वटारून पाहू नये. महाराष्ट्राचे पाणी मोजण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र वाघ आहे. वाघाच्या शेपटीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुंबईत येणार्या परप्रांतीयांच्या लोंढ्याबाबत स्पष्ट उल्लेख टाळताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाषावर प्रांतरचना झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेण्यातस आम्ही समर्थ आहोत. ज्या त्या सरकारने आपल्या जनतेची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे याप्रकरणी नाव न घेता आम्हाला घर पेटवायचे नाही तर घरातील चुल पेटवायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील मावळ्यांमध्ये खूप ताकद आहे. आम्हाला पुन्हा एकदा म्यानातून तलवार बाहेर काढण्याची वेळ येऊ देऊ नका असा सबुरीचा सल्लाही त्यांनी याप्रकरणी दिला. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती हाच एकमेव मार्ग आहे. हा मुद्दा शिवसेनेने आज काढलेला नसून २००४ च्या जाहीरनाम्यातच तसा उल्लेख आहे. काहीही झाले तरी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी ठणकाहून सांगितले. कर्जमुक्तीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खिसे भरतील असे काही जणांना वाटते. मात्र शेतकर्यांचा पैसा कोणालाही खाऊ देणार नाही. नाहीतर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून नाव लावणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टिका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा 'झुल्फीकार' असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या केसाएवढी काळजी राज्यातील शेतकर्यांची घेतली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. शेतकर्यांचे पुत्र म्हणवून घेणारे शरद पवार यांचे छायाचित्र कधीच शेतकर्यांसोबत येत नाही. उलट क्रिकेटपटूंसोबतचे त्यांचे छायाचित्रे नेहमीच प्रसिद्ध होतात. क्रिकेटपटूंचा लिलाव करून कोटावधी रुपयांची उलाढाल करण्यापेक्षा हाच पैसा शेतकर्यांच्या हितासाठी वापरला असता तर बरे झाले असते, असे ठाकरे म्हणाले. शेतकर्यांना शेती सोडण्याचा सल्ला देणारे शरद पवार शेतकर्यांनी नेमके काय धरावे? हेही सांगितले पाहिजे.
कर्जमुक्ती मेळाव्यानंतर सरकारला जाब विचारण्यासाठी २६ तारखेपासून 'आसूड मारा' आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.