गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधील सर्व पदांचा एकाएकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. मात्र त्यांच्या या निर्णयामागे तिसर्या आघाडीची चूल पेटविण्याचा विचार असल्याचे जाणवते आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट नेते महसुलमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून साईडलाईनला पडलेले नेते छगन भुजबळ यांना सोबत घेऊन मुंडे नवीन आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत. असे झाल्यास राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणे तयार होतील हे स्पष्ट आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष निर्णय प्रक्रियेत आपल्याला सामावून घेतले जात नाही, असे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार म्हणजे मुंडेची पक्ष सोडण्याचीच तयारी असल्याचे समजते. राज्यातील असंतुष्ट तसेच ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन नवीन आघाडी तयार करण्याची योजनाच त्यांनी आखली आहे. या आघाडीत छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार व केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील ,बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आदींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंडे यांना प्रमोद महाजनांच्या निधनांनंतर भाजपात दुय्यम स्थान दिले जात होते. ते पक्षात एकाकी पडले होते. गेल्या सहा महिन्यांपासून याची प्रकर्षाने जाणीव होत होती. भाजपमध्ये उत्तर भारतीयांची चलती सुरु झाली. आरएसएस व भाजपमध्ये अशा प्रकारे पदाचा राजीनामा देण्याची शिस्त नाही. मुंडे हे आरएसएसमधूनच सक्रिय राजकारणात आल्यामुळे त्यांना पक्षाची शिस्त माहित आहे. असे असतांनाही त्यांनी अचानक पदाचा राजीनामा द्यावा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते पक्ष सोडण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट होते. २५ एप्रिलपासून गोपीनाथ मुंडे संवाद यात्रा काढणार आहेत. ही यात्रा म्हणजे आपल्या भावी राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न असल्याचे समजते. या
संवाद यात्रेत ते भाजपच्या पदाधिका-यांशी चर्चा करतील व भाजप नसतांना कोण आपल्याला साथ देतय याचा आढावा घेतील अशी शक्यता त्यांच्याच प.क्षातील कार्यकर्ते सांगतात. मुंडे यांनी एकदम पक्ष न सोडता पदाचाच राजीनामा दिला याच्या मागचे कारण असे की, त्यांना पक्षातील पदाधिका-यांशी बोलणी करायची आहे,अशीच शक्यता वर्तविली जात आहे.केंद्रीय पातळीवर त्यांच्या राजीनाम्याची फारशी दखल न घेतल्यामुळे ते भाजपलाच सोडचिठ्ठी देतील असे समजते.