Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या युती सरकारला धडा शिकवा - अजित पवार

सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या युती सरकारला धडा शिकवा - अजित पवार
, सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (14:02 IST)
शेतकरी, व्यापारी, मराठा, धनगर समाजासह राज्यातील प्रत्येक घटक आज युतीच्या सरकारवर नाराज असून, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या या सरकार विरुद्धचा असंतोष आगामी नगर पालिका निवडणुकीत व्यक्त करुन या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी केले. परळी नगर परिषदेच्या भव्य प्रशासकीय इमारत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना तटकरे यांनी धनंजय मुंडे  हे जनतेच्या मनातील आणि राज्याच्या राजकारणातील खरे हिरो आहेत, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या कार्याचा गौरव केला. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे , माजी मंंत्री प्रकाश सोळंके, सुरेश धस, मार्केट कमिटीचे सभापती पंडीतअण्णा मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे , जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, डॉ.आ.मधुसूदन केंद्रे, आ.श्री.रामराव वडकुते, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, युवक नेते अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, जिल्हा मजुर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, जिल्हा परिषदेचे सभापती बजरंगबप्पा सोनवणे, संदिप क्षीरसागर, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
 
सेना-भाजपकडून फुले-शाहु-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मागे नेण्याचे प्रयत्न सुरू आहे अशी टीका यावेळी अजित पवार यांनी केली. राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. आधी कोरड्या दुष्काळात आणि आता ओल्या दुष्काळात शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. अच्छे दिन आणि पंधरा लाख रुपयांचे खोटे आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी,व्यापारी आणि समाजातील प्रत्येक घटक या सरकारवर नाराज आहे. सत्तेतला एक भागीदार पक्ष शिवसेना जवानांचा, महिलांचा व्यंगचित्रांच्या माध्यमातून अपमान करीत आहे. राज्यात लाखोंचे मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना हे सरकार काहीही करण्यास तयार नाही अशा जनता विरोधी सरकारविरुद्धचा असंतोष आगामी निवडणुकीत दाखवुन द्या, असे आवाहन पवार यांनी केले. 
 
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे हे आता केवळ परळीचे नेते नसून राज्याचे नेते आहेत, सभागृहातील त्यांची कामगिरी सरस आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे असे असले तरी त्यांचे कायम लक्ष आणि प्रेम परळी शहरावर असते, अशा नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन करत धनंजय मुंडे सध्याच्या राजकारणातील जनतेच्या मनातील खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.
 
ज्या लोकनेत्यासोबत राहून लहानाचा मोठा झालो त्या आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे नाव नटराज रंग मंदिरास देऊन आपण त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. परळी शहराच्या मागील काळातील सर्वांगीण विकासाचे श्रेय आदरणीय अजितदादा यांनाच असल्याचे सांगत त्यांच्यामुळेच शहराचा विकास झाल्याचे मुंडे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हेडफोन लावून गाणं ऐकत होता, करंटने मृत्यू