Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कदाचित तुमचे पालक तुमच्याशी असे वागलेही असतील, पण कृपया तुम्ही तुमच्या मुलांशी असं वागू नका

कदाचित तुमचे पालक तुमच्याशी असे वागलेही असतील, पण कृपया तुम्ही तुमच्या मुलांशी असं वागू नका
- डॉ. श्रुती पानसे
मेंदू व शिक्षण अभ्यासक
आपल्यापेक्षा दुसऱ्याला चांगली संधी मिळाली, आपल्यापेक्षा दुसऱ्याला चांगले मार्कस मिळाले, प्रेमात नकार मिळाला, तर काय करायला हवं? तो विषय तिथेच सोडून आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवं की टोकाला जाऊन दुसऱ्याला शिक्षा करायला हवी?
 
अशी एखादीच घटना घडते, पण ती विचार करायला भाग पाडते. समाज माध्यमांवर मतांचं पेव फुटतं. घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर टीका केली की आपलं काम झालं... अशा घटनांना त्यांचे पालकच जबाबदार आहेत, असं म्हटलं की झालं!
 
वास्तविक कोणतेही पालक आपल्या मुलांना वाईट गोष्टी शिकवत नाहीत. विशेषत: मुलं मोठी झाली की तर तेच आपला मार्ग निवडतात.
 
पण असं असलं तरी आपल्या वागण्या- बोलण्यातून काही चुकीचे संदेश मुलांपर्यंत पोहचत नाहीत ना, याची काळजी घ्यायला पाहिजे.
 
प्रसंग एक
 
सातवी आठवीतलं मूल शाळेतून घरी येतं. कोणतातरी राग मनात असतो, पण अजून त्याचा स्फोट झालेला नसतो. राग धरून ठेवलेला असतो. घरातलं एक छोटंसं कारण पुरतं. आणि एकदम भडका उडतो. खरंतर समोर घडलेली घटना हे मूळ कारण नसतंच.
 
प्रसंग दोन
 
शाळेतून घरी येतानाच चेहरा कमालीचा फुललेला आहे. शाळेत भरपूर कौतुक झालेलं आहे. बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. ती छान बातमी घरी सांगितल्यावर आजीला, काकूला, मामाला सगळ्यांना फोन केले जात आहेत.
 
कोणाच्याही आयुष्यात घडणाऱ्या या अगदी साध्या घटना आहेत. खरंतर असं ही म्हणू शकतो की एकाच माणसाच्या आयुष्यातही वेगवेगळ्या टप्प्यावर अशा दोन टोकाच्या गोष्टी घडत असतात. या दोन्ही प्रकारच्या परिस्थिती नेमक्या कशा असतात?
 
अपयशाची परिस्थिती
खूप मेहनतीने, विचारपूर्वक, अनेक दिवस त्यात लक्ष घालून एक प्रकल्प तयार केला. पण त्या प्रकल्पाला हवे तसे मार्क मिळाले नाहीत.
 
पेपर खूप चांगले लिहिले. पण दुसरा नंबर आला.
 
स्पर्धेची मन लावून जीव ओतून तयारी केली, पण यश हाती आलं नाही.
 
यशाची परिस्थिती
खूप मेहनतीने, विचारपूर्वक, अनेक दिवस घालवून एक प्रकल्प तयार केला. प्रयत्नांचं चीज झालं. भरभरून मार्कस मिळाले.
 
पेपर खूप चांगले लिहिले. पहिला नंबर आला.
 
स्पर्धेची मन लावून जीव ओतून तयारी केली, घवघवीत यश मिळालं, शिवाय अपार कौतुक झालं.
 
प्रतिक्रिया काय असतात?
एका प्रसंगात निराशा आहे, तर दुसऱ्या प्रसंगात आनंद आहे. दोन अगदी वेगवेगळ्या भावना आहेत. या भावनांना मूल तिच्या/त्याच्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे. या प्रतिक्रियांना पालक म्हणून कशी प्रतिक्रिया द्यायची?
 
आनंदात आनंद मानणं हे सोपं आहे. पण त्यातही शांतपणा हवा. तर, निराशेत आशावादी बोलण्यासाठी योग्य शब्द सुचावे लागतात.
 
ते योग्य पद्धतीने बोलावे लागतात. काय बोलायचं हे अर्थातच तो प्रसंग, वय, आसपासच्या व्यक्ती, भावनांची तीव्रता यावर अवलंबून आहे. पण तरीही किमान आपल्या हातून एकदम चुकीचं काही बोललं जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
 
प्रसंग हाताळताना...
आपल्या मुलाचं/मुलीचं यश हे साजरं करायलाच पाहिजे. आनंद व्यक्त करायलाच पाहिजे. पण त्या नादात ‘बरं झालं, तुझाच नंबर आला, त्या दुसऱ्याचा किंवा तिसरीचा आला नाही ’, ‘तू आहेसच विनर. तुझा नंबर येणारच होता’, ‘आपल्या घराला सवयच आहे जिंकण्याची ’, ‘लाईफ इज अ रेस. विनर इज विनर ’ असं बोलण्याची काही गरज आहे का? की यशाचं निर्भेळ कौतुक करणं पुरेसं आहे?
 
‘तू वेळीच मेहनत घेतलीस म्हणून छान झालं. ’, ‘तुझ्यात हे सुप्त गुणही आहेत, हे एवढ्या प्रकर्षाने लक्षात आलं नव्हतं. ते या निमित्ताने कळलं. ’, ‘मागच्या वेळेपेक्षा आजचा परफॉर्मन्स चांगला होता. सुधारणा आहे. ’ अशी वाक्यं जास्त बरी. कारण या वाक्यात इतर कोणाशी स्पर्धा नाही. स्पर्धा असलीच तर ती स्वत:शी आहे. स्वत:च्या कामगिरीशी आहे.
 
समजा अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही तर, ‘जिंकणारा कोणीतरी एकच असतो आणि ती व्यक्ती म्हणजे तू नाहीस. ’, ‘सो पुअर’ , ‘तो किंवा ती बघ, किती स्मार्ट आहे. नाहीतर आपण.. बावळट!’ अशा वाक्यांची, उद्गारांची आणि जोडीला पडलेल्या / चिडलेल्या / निराश चेहऱ्याने हे बोलायची काही गरज नाही.
 
येता-जाता नातेवाईकांना आपल्या मुलाचं/मुलीचं अपयश सांगायची गरज तर त्याहून नाही. विशेषत: जे आईबाबा – आजी आजोबा स्वत: कोणीतरी थोर असतात, भयंकर यशस्वी आणि स्मार्ट असतात, त्यांनी ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे.
 
अशा छोट्या छोट्या वाक्यांनी मुलांच्या मनात कडवटपणा निर्माण होतो. जसं जसं मूल मोठं होईल, तसा तो कडवटपणा वाढण्याची शक्यता असते. वाईट असं की स्पर्धा अशी मनात भिनत जाते. आणि अशा स्पर्धेला कुठे अंतच राहत नाही.
 
यांची सुरुवात घरातून... आपल्या वाक्यातून होत नाही ना हे बघूया.
 
यापेक्षा अपयश आलं तर ‘नक्की आपण कुठे कमी पडलो, हे शोधून काढू.’, ‘आजचं अपयश ही काही आयुष्यातली अंतिम गोष्ट नाही. खूप काही करायचं आहे अजून. कितीतरी संधी अजून येतील. ’, ‘अपयश हे अपयश असतं, अशी वाक्यं तुझ्या आत्ता मनात येतील, त्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस ’ असं बोललो तर उद्याच्या यशाची बीजं आपण पेरत आहोत, हे नक्की.’ यातून आपण भावनिक बुद्धिमत्ता रुजवत आहोत.
 
अनेकदा असं होतं की पालक पूर्णपणे सकारात्मक असतात. पण मुलांच्या मनात स्पर्धा भावना असते. अपयश जास्त जिव्हारी लागलेलं असतं.
 
वर्गातल्या मुलांनी ‘लूझर’, ‘मंद’ असं काहीतरी बोलून टवाळी केलेली असते. अशावेळी सकारात्मक शब्दांचा थोडासाच उपयोग होतो. कारण या वाक्यांनी त्यांचं पूर्ण समाधान होत नाही. त्यांच्या पुढचे प्रश्न यामुळे सुटत नाहीत.
 
अशा प्रसंगात दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे त्यांना पूर्णपणे बोलून / रडून मोकळं होऊ द्यावं. मध्ये काहीच बोलू नये. सल्ले तर नकोतच. यामुळे मनातली खळबळ बाहेर पडेल आणि खरेखुरे प्रश्न काय आहेत हे आपल्याला आणि मुलांनाही समजेल.
 
दुसरं म्हणजे मुलांनी चिडवलं तर त्याला चांगल्या शब्दात कसं उत्तर द्यायचं हे सांगायचं. उदाहरणार्थ, ‘मी लूझर नाही हे मला नीटच माहीत आहे. ’, हे अतिशय आत्मविश्वासाने सांगणे , ‘जो / जी जिंकली आहे, त्यांच्याशी माझी खूप चांगली मैत्री आहे ’, असं ठणकावून सांगणे, मित्र चिडवत असतील तर त्यांना बोलायचं ते बोलू द्यायचं आणि त्यानंतर काहीच प्रत्युत्तर न देता तिथून निघून यायचं. यामुळे चिडवण्याचा त्यांचा मूळ हेतू नष्ट होईल.
 
अशा पद्धतीने बोललो तर मुलांमधली मानसिक शक्ती आपण वाढवत आहोत असाच यांचा अर्थ आहे. आयुष्यात अनेकदा अपयश येणार आहे, एखाद वेळेला शाळेत, कॉलेजमध्ये, करियरमध्ये, ऑफीसमध्ये, खाजगी आयुष्यात- कुठेही काहीही घडून येऊ शकतं.
 
अशा वेळी ही मानसिक शक्ती आयुष्यभर मदत करेल. स्वत:मधला आत्मविश्वास कमी होऊ देणार नाही. कधीही नकार येऊ शकतो, अगदी काही काळ असा जाईल की सातत्याने नकार मिळत जातील, या प्रत्येक अपयशाचा फूटबॉल करून परतवता आला पाहिजे, अशी मानसिक शक्ती तयार झाली पाहिजे.
 
हे समजावून सांगण्यासाठी कितीतरी खऱ्या आयुष्यातली उदाहरणं आपल्याकडे आहेत. डॉ. कलाम, अमिताभ बच्चन, सचिनच्या नावावरचे विक्रम, एकलव्य. फार लांब जाण्याचीही गरज नाही, आपल्या स्वत:च्या आयुष्यातच कितीतरी नकार, कितीतरी पाय खेचण्याचे प्रसंग आले आहेत, यातून कशी उभारी घेतली हे मुलांना सांगता येईल.
 
स्वत:शी चांगलं बोलूया का?
निराशा ताजी असते तेव्हा जखम ओली असते, साहजिकच दु:खही जास्त असतं. हे दु:ख समजू शकतो, पण मुलांच्या मनातल्या मनात स्व संवाद काय चालू आहे, हे आपल्यापर्यंत पोहचलं तर योग्य दिशेने संवाद आहे का हे समजेल. त्यात काही वेगळं वळण नाही ना? जसं की,
 
हा स्वसंवाद निराशा –
 
निराशेकडून स्वत:ची निंदा –
 
तिथून मत्सर –
 
टोकाचा मत्सर –
 
शत्रुत्वभावना –
 
टोकाचं वाईट पाऊल प्रत्यक्ष उचलणे
 
अशा पायरी पायरीने अजून खालच्या दिशेने जात असेल तर तो वेळीच वळवणं आवश्यक आहे.
 
मग प्रसंग कोणताही असो- परीक्षेत नापास होणं, चांगल्या कॉलेजमध्ये दुसऱ्याला प्रवेश मिळणं, पण आपल्याला नाही, प्रेमात नकार, करियरमधली स्पर्धा – असं काहीही. स्व संवाद हा आत्मविश्वास वाढवणाराच हवा.
 
आणि यासाठी आधी स्वत:मध्ये आणि मग आपल्या मुलांमध्ये समस्या हाताळण्याची कौशल्य (प्रॉब्लेम solving skills ) यायला हवीत. स्वत:मध्ये यादृष्टीने जाणीवपूर्वक बदल घडवणं आणि अनुकरणातून मुलांनी शिकणं हा सर्वात नैसर्गिक आणि खरा मार्ग आहे. शालेय / महाविद्यालयीन अभ्यासात दाखवलेल्या बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता ही अतिशय महत्त्वाची असते.
 
घरात आपल्याशिवाय टीव्ही नावाचा गुरू असेल आणि त्यात जर ‘मी बघूनच घेईन, तिला हे मिळतंच कसं... आणि मला नाही..? ’ , ‘तो माझ्यापुढे जाऊच शकत नाही. ’ ‘मी एकदा ठरवलं की ठरवलं . ’ असे संवाद त्यातल्या कट कारस्थानांसह सहज ऐकायला येत असतील तर यांचा डेली डोस मुलांना आपसूकच मिळतो आहे हे समजून चालावं.
 
टीव्ही मालिकांचा खूप मोठा परिणाम मुलांवर होत असतो हे नाकारण्यात अर्थ नाही. हे संवाद आधी पुसून टाकण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. आपण समजतो तसा नकाराचा स्वीकार करणं इतकंही अवघड नाही, हे पटलं पाहिजे.
 
मुळात आपापसातली स्पर्धा वाढीला का लागते? टोकाला का पोहचते? याचा विचार करून ती तशी वाढीला लागू नये म्हणून प्रयत्न करायला हवेत. आपल्याला स्वत:ला एखाद्या गोष्टीत नकार मिळतो तेव्हा घरात आपण या परिस्थितीबद्दल काय बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण निराशा – राग- मत्सर व्यक्त करत राहतो का, हे तपासलं पाहिजे.
 
एखाद्या पेल्यात निम्म पाणी असेल तर तो अर्धा भरलेला आहे, असं म्हणायचं की अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं? कारण दृष्टिकोन घडायला इथेच सुरुवात होते.
 
भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक
आपले आई बाबा आपल्याला घडवत असतात. जगातल्या चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देत असतात. पण त्यांनी ‘घडवायला’ही काही मर्यादा आहेत. याचं कारण सध्याच्या पिढीवर असलेला समाजाचा प्रभाव.
 
समाजात जे दिसतं त्याचं प्रतिबिंब मुलांच्या मानसिकतेवर पडणारच. कारण मूल पालक – शाळा – समाज असं सर्वांचं असतं. याशिवाय कधी अत्यंत सकारात्मक, तर कधी विषारी अशा समाजमाध्यमांचा प्रभाव मुलांवर असतो.
 
जसं वय अठराचा उंबरठा पार करतं, त्यानंतरच्या यशा-अपयशाची, चांगल्या – वाईट परिस्थितीची, स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्वत:कडे घ्यायला पाहिजे.
 
सज्ञान झालेल्या मुलांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वर्तनाची जबाबदारी पालक कसे घेणार? पण तरीही लहानपणापासून भावनिक बुद्धिमत्ता रूजवली तर काही अंशी मुलांच्या विघातक वर्तनाला योग्य दिशा देता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pressure Cooker मध्ये हे 7 पदार्थ मुळीच शिजवू नये