Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदूरचे खजराना गणपतीचे मंदिर

इंदूरचे खजराना गणपतीचे मंदिर
, सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (15:17 IST)
ऊँ गं गाणपत्ये नमो नमः 
सिद्धी विनायक नमो नमः 
अष्ट विनायक नमो नमः 
गणपती बाप्पा मोरया...  
 
इंदूरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. 
 
पंडितजींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या दरबारात स्वप्नकथन केले. पंडितजींना स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करण्यात आले. खोदकामानंतर निघालेल्या गणपतीच्या मूर्तीची येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अल्पावधीतच मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरली. मंगलमूर्ती मोरयाचे येथील जागृत वास्तव्य भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. मनोकामना करून भक्तीभावाने येथे धागा बांधल्यास भक्ताची इच्छापूर्ती होते. 
 
मनोकामना पूर्तीनंतर येथे बांधण्यात आलेल्या हजारो धाग्यांमधून भक्त कोणत्याही एका धाग्याची गाठ सोडते. मंदिर परिसर भव्य व मनोवेधक आहे. मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर देव-देवतांची लहान-मोठी 33 मंदिर येथे आहेत. मुख्य मंदिरात गणपतीच्या प्राचीन मूर्तीसहित भगवान शंकर व दुर्गामाता यांच्या मूर्त्याही आहेत. इतर 33 मंदिरातून अनेक देव-देवतांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या विस्तृत पसरलेल्या आवारात पिंपळाचा प्राचीन वृक्षही आहे. 
 
वृक्षास मनोकामना पूर्ण करणारा मानण्यात येते. मंदिरात येणारे श्रद्धाळू या वृक्षास प्रदक्षिणा जरूर घालतात. वृक्षावर हजारो पोपटांचे वास्तव्य आढळते. संध्याकाळच्या प्रसन्न, स्वर्गीय वातावरणात आपल्या मधूर वाणीने अधिकच भर घालतात. सर्वधर्मसमभाव या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोणत्याही धर्मीयास येथे प्रवेश वर्ज्य नाही. हिंदुप्रमाणेच इतरधर्मीयही येथे येवून नतमस्तक होतात. वाहन खरेदीनंतर अनेकांची वाहन घेऊन पहिली भेट असते ती खजराना मंदिराचीच. 
 
भगवान विघ्नहर्त्याशी निगडीत सर्वच उत्सव येथे तेवढ्याच उत्साहाने पार पडतात. दर बुधवारी येते यात्रा भरते. यावर्षी गणेशोत्सवास येथे अकरा लाख मोदकांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. मंदिराच्या निर्माणापासून पंडित मंगल भट्ट कुटुंबीयच मंदिराची सेवा व देखरेख करत आहेत. 
 
काही वर्षांअगोदर वाद उद्भवल्याने जिल्हा प्रशासनाकडे व्यवस्थापन सोपवण्यात आले होते. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत भट्ट कुटुंबीयांचे सक्रीय योगदान आहे. सद्या भालचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख, व्यवस्था सांभाळण्यात येते. मंदिराच्या पुननिर्माणासाठी त्यांनी कित्येक वर्ष उपवास पाळला आहे. वयोवृद्ध भालचंद्र महाराज प्रमुख प्रसंगी आजही पूजाअर्चा करतात. 
 
कधी जायचे - मंदिराच्या दर्शनासाठी आपण कधीही जाऊ शकता. मंदिरास लागूनच प्रत्येक बुधवारी यात्रा भरते. मंदिरातील विशेष आयोजन बघायचे झाल्यास गणेश चतुर्थीस अवश्य भेट द्या. यावेळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. गणपतीस विशेष नैवद्य अर्पण करतात. 
 
पोहचायचे कसे - इंदोर मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी आहे. आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गाने हे शहर जोडलेले आहे. देशभरातून येथे पोहचण्यासाठी रस्तामार्ग, रेल्वे व हवाई सेवा उपलब्ध आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi