Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णाकाठचे औंदुंबर

कृष्णाकाठचे औंदुंबर
श्रीनरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांची वर्दळ नेहमी असे.

कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते. त्यामुळें या निसर्गसिद्ध तपोवनांत, औंदुंबरांच्या दाट शीतल छायेंत शके 1344 च्या सुमारास श्रीनरसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिलें. येथील कृष्णेचा घाट प्रशांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचें मंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहे, तो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे.

पावसाळ्यांत श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन.1926 मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे. पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतील नित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्‍थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत.

मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. आकाशांत सूर्य तळपत असतांना भूमीवर छाया-प्रकाशाची रांगोळी तळपत राहते. या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष 1826 च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. येथील शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचें यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्रीगुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रांतील कथा याच स्थानांत घडलेली आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)

समन्वयाची देवता - श्री दत्त

Share this Story:

Follow Webdunia marathi